मुंबई : नेरुळ-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कामांना गती दिली जात असून या मार्गावरील प्रवाशांना नव्या वर्षांत दिलासा मिळणार आहे. या उनपगरीय मार्गातील खारकोपर-उरण हा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२३ पासून प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. या टप्प्याचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेरुळ-बेलापूर-खारकोपर ते उरण रेल्वे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. एकूण २७ किमी लांबीचा हा मार्ग असून यातील नेरुळ ते बेलापूर, खारकोपर हा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रवाशांच्या सेवेत आला. सध्या या लोकल प्रवासासाठी प्रवाशांना २० मिनिटे लागतात. नेरुळ-उरण संपूर्ण प्रकल्प भूसंपादनासह अनेक अडथळय़ांमुळे रखडला होता. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर यातील खारकोपर ते उरण दुसरा टप्पाही पूर्ण होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.

दुसरा टप्पा सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेने ठेवले होते. मात्र त्यालाही विलंब झाल्याने  ५०० कोटी रुपये असलेला प्रकल्प १ हजार ७०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती दिला जात असून ८५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. सध्या या मार्गिकेतील किरकोळ कामे बाकी होत असून जानेवारी २०२३ पर्यंत ती पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर साधारण फेब्रुवारी २०२३ पासून खारकोपर ते उरण मार्ग प्रवाशांच्या सेवेत येईल. यामुळे नेरुळ ते उरण ही संपूर्ण मार्गिकाच प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. या कामासाठी सिडकोकडून ६७ टक्के आणि ३३ टक्के रेल्वेकडून निधी मिळत आहे.

दुसऱ्या टप्प्यात आणखी काय?

  •   खारकोपर ते उरण उपनगरीय मार्गात पाच नवीन स्थानके येणार आहेत. यामध्ये गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी, उरण या स्थानकांचा समावेश आहे.
  •   प्रकल्प पूर्ण झाल्यास नेरुळ व उरणवासियांबरोबरच अन्य प्रवाशांनाही त्याचा बराच फायदा  होणार आहे. जेएनपीटी आणि येत्या काळात तयार होणारे नवी मुंबई विमानतळही जोडले जाईल.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief for nerul uran passengers new year second phase kharkopar uran suburban route service ysh
First published on: 23-11-2022 at 01:02 IST