मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना विविध तीर्थस्थळांचे दर्शन घेता येणार असून निरनिराळ्या स्थळांची सफरही करता येणार आहे. शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले पुरातन मंदिरांचे देखावे तसेच मंदिरांचे भव्य प्रवेशद्वार लक्षवेधी ठरत आहे. तसेच काही मंडळांनी गणेशमूर्तीच्या अनुषंगाने साकारलेली मंदिरे तसेच महालाच्या स्वरूपातील सजावट आकर्षक ठरत आहे.
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा तिरुपती बालाजीच्या सुवर्ण राजमुकुटाच्या संकल्पनेवर आधारित आरास केली आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. यंदा प्रथमच मंडपाची उंची ५० फुटांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच परळमधील नरेपार्क मैदानात परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती यंदा श्रीरामाच्या रुपात आहे.
त्या अनुषंगाने मंडळाने अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारला आहे. तसेच ‘परळचा लंबोदर’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या परळमधील लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती यंदा ज्योतिबाच्या रूपात आहे. या अनुषंगाने मंडळाने सजावट केली असून लक्ष्मी कॉटेज इमारतीच्या सुरुवातीला उभारलेले कोल्हापूरमधील ज्योतिबा मंदिराचे प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

दरवर्षी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे गणेशगल्लीत प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि विविध मंदिरांचे भव्य देखावे साकारले जातात. हे देखावे साकारण्यासाठी कला दिग्दर्शकांपासून कारागीर दोन ते तीन महिने अहोरात्र मेहनत घेत असतात. गणेशगल्लीतील देखावे पाहण्यासाठी नागरिकांच्या रात्रंदिवस रांगा लागतात.
यंदा लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे गणेशगल्लीत तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील श्री रामनाथस्वामी मंदिर साकारण्यात आले आहे. तसेच चेंबूरमधील टिळक नगर येथील सह्याद्री क्रीडा मंडळही विविध संकल्पनांवर आधारित देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. यंदा सह्याद्री क्रीडा मंडळाने गजराज संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक अमन विधाते मुंबईतील विविध भागात पुरातन मंदिरांचे देखावे साकारत असतात. यंदा अमन विधाते यांनी ठाण्यातील किसन नगर येथे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर तसेच गणेशगल्लीत तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील श्री रामनाथस्वामी मंदिराचे भव्य प्रवेशद्वार साकारले आहे.
पुरातन मंदिरांचे मूळ स्वरूप जपण्याचा प्रयत्न : अमन विधाते
‘मी गेल्या चाळीस वर्षांपासून गणेशोत्सवात विविध संकल्पनांवर आधारित देखावे व मंदिरे साकारत आहे. पुरातन मंदिरांचे मूळ स्वरूप जपून आकर्षक पद्धतीने साकारणे आणि जुन्या रचनेला लक्षवेधी साज देणे, आव्हानात्मक असते. आपण संबंधित कामाच्या खोलवर किती जातो, हा महत्वाचा मुद्दा असतो. तसेच आर्थिक बाजू सांभाळून काम वेळेत पूर्ण करण्याचेही आव्हान असते. मात्र कामातील सातत्य व एकाग्रतेमुळे सारे काही जुळून येते’, असे प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.