रस्ते अपघात: राज्याचे हवाई रुग्णवाहिका धोरण कागदावरच!

रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचविता यावे यासाठीचे राज्याचे हवाई रुग्णसेवेचे (एअर अॅम्ब्युलन्स) धोरण आजही कागदावरच असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

रस्ते अपघात: राज्याचे हवाई रुग्णवाहिका धोरण कागदावरच!
राज्याचे हवाई रुग्णसेवा

– संदीप आचार्य, लोकसत्ता

गेल्या दशकभरात रस्त्यावरील अपघातातील जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूंची संख्या वाढत आहे. असं असताना रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचविता यावे यासाठीचे राज्याचे हवाई रुग्णसेवेचे (एअर अॅम्ब्युलन्स) धोरण आजही कागदावरच असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्गावर रविवारी पहाटे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. या निधनाच्या पार्श्वभूमीवर गाडीच्या चालकाच्या म्हणण्यानुसार वेळेवर मदत मिळाली नाही, तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी माहिती मिळताच पोलीस तात्काळ पोहोचले होते.

गेल्या दशकात अभिनेता आनंद अभ्यंकर यांच्यापासून विनायक मेटे यांच्यासारख्या नेत्यांच्या मृत्यूनंतर वेळोवेळी महामार्गावर ट्रॉमाकेअर रुग्णालय सुरु करण्यापासून ते हवाई रुग्णवाहिका सेवा देण्याबाबतचे मुद्दे उपस्थित झाले आहेत. तसेच मागण्याही वेगवेगळ्या घटकांकडून करण्यात आल्या आहेत. मात्र राज्य सरकारने आजपर्यंत याबाबत सुस्पष्ट धोरण निश्चित करून रस्ते अपघातातील रुग्णोपचारासाठी हवाई रुग्णवाहिकेबाबचे साधे धोरणही निश्चित केलेले नसल्याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकार्याने सांगितले.

एकट्या मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर २०१९ ते २१ या काळात ७१४ अपघात झाले आहेत. यात २४६ लोकांचे मृत्यू झाले, तर ३८७ लोक गंभीर जखमी झाले आहेत. राज्यात २०२१ मध्ये झालेल्या १२,५५३ अपघातात १३,५२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ३१५१ अपघातात ३४११ लोकांचे मृत्यू झाले, तर २०४९ लोक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

रस्ते अपघात टाळण्यासाठी तसेच ट्रॉमाकेअर रुग्णालय सुरु करण्याबाबतचे धोरण केंद्र सरकारने तयार केले असून यातील रस्ते अपघात टाळण्यासाठीच्या अनेक उपाययोजना राज्य शासनाने केल्या असल्या तरी टर्शरी ट्रॉमाकेअर रुग्णालय सुरु करण्याबाबत राज्य शासन उदासीन राहिल्याने तसेच आरोग्य विभागाला यासाठी पुरेसा निधी उपलब्ध न करून दिल्यामुळे अपघातातील गंभीर रुग्णांसाठीचे टर्शरी ट्रॉमाकेअर रुग्णालय खर्या अर्थाने आरोग्य विभाग अद्यापि सुरु करू शकले नसल्याचे आरोग्य विभातील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

आरोग्य विभागाअंतर्गत राज्यात एकूण १०८ ट्रॉमाकेअर सेंटर मंजूर आहेत. तर नवीन बृहत आराखड्यात आणखी ४० सेंटर मंजूर करण्यात आली आहेत. यातील आरोग्य विभागाच्या ६३ ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमाकेअर सेंटर सुरु करण्यात आली असली तरी तेथे केवळ प्राथमिक उपचार करण्याचीच व्यवस्था असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. अलीकडेच एका टर्शरी ट्रॉमाकेअर सेंटरचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्गावर आरोग्य विभाग, एमएसआरडीसी व खाजगी रुग्णालय यांच्या सहभागातून ट्रॉमाकेअर सेंटर सुरु केले होते. मात्र गंभीर व अतिगंभीर रुग्णांवर येथे उपचार होत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या रुग्णालयासाठी हॉटलाईन देण्यासह अनेक घोषणा तेव्हा करण्यात आल्या होत्या.

सुसज्ज ट्रॉमाकेअर सेंटर सुरु करावयाचे असल्यास येणारा किमान १५ कोटींचा खर्च लक्षात घेता तसेच केंद्र सरकारचे या बाबतचे धोरण व निकष लक्षात घेता हवाई रुग्णसेवा जास्त उपयुक्त व कमी खर्चाची ठरेल हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाअंतर्गत याविषयी अनेकवेळा चर्चा होऊन प्रस्ताव तयार करण्याचे ठरले होते. मात्र निधी अभावी असा ठोस प्रस्ताव आजपर्यंत तयार केला नसल्याचे आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांनी सांगितले.

मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात झाल्यास गंभीर रुग्णाला पनवेल वा पुणे येथील रुग्णालयातच न्यावे लागते हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने भाड्याच्या हवाई रुग्णसेवेच्या पर्यायाचाही विचार केला होता. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गंभीर रुग्णांवर प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणारी रुग्णालये वा खाजगी मोठ्या रुग्णालयातच उपचार होऊ शकतो. राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच अपघातग्रस्त जागा यांचा विचार करता हवाई रुग्णसेवा हाच प्रभावी विचार ठरू शकतो.

हेही वाचा : “विनायक मेटेंना अचानक मुंबईला बोलावलं कुणी? चौकशी करा”; अरविंद सावंतांची मागणी

जागोजागी ट्रॉमाकेअर सेंटर काढणे व चालवणे हे अत्यंत खार्चिक असून प्राथमिक उपचार आरोग्य विभागाच्या कोणत्याही रुग्णालयात करता येतील. मात्र अपघातात मेंदूला इजा होणे, रक्तस्राव होणे, हाड मोडण्यासह गंभीर दुखापती होतात अशा रुग्णांसाठी तात्काळ उपचार मिळणे गरजेचे असून यासाठी किमान आतातरी राज्य सरकारने तात्काळ हवाई रुग्णसेवेचे धोरण निश्चित करून अंमलबजावणी केली पाहिजे असे, आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Report on air ambulance policy of maharashtra and failure in implementation pbs

Next Story
“विनायक मेटे यावेळी मंत्रिपदाचे दावेदार होते, त्यांनी…”, भावूक होत दीपाली सय्यद यांचं मोठं विधान
फोटो गॅलरी