मुंबई : स्थानिक रहिवाशांनी केलेली मागणी आणि पर्यावरणप्रेमींनी थेट मुख्यमंत्र्यांना घातलेले साकडे आदी बाबी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने पवई तलावाच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ५ संयंत्रांच्या मदतीने तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी पवई येथील स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी पवई तालावाची स्वच्छता आणि जलपर्णीमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याप्रकरणी रहिवाशांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर तलावातील जलपर्णी काढण्यासाठी तात्काळ ५ संयंत्रे आणि अधिकच्या मनुष्यवळाचा वापर करावा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले होते. पाच संयंत्रांद्वारे तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, तसेच या कामावर देखभाल करण्याची सूचना जलअभियंत्यांना करण्यात आल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सांगितले.

ऑनलाईन याचिका

पवई तलाव स्वच्छ आणि जलपर्णीमुक्त करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आता समाज माध्यमांचा आधार घेतला आहे. या परिस्थितीबाबत ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली असून नॅटकनेक्ट फाउंडेशनने ही ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.