* शहरांमध्येआजपासून निर्बंध शिथिल : तब्बल ७२ दिवसांनंतर दुकाने उघडणार; रिक्षा-टॅक्सीही सुरू , मुंबई महानगर क्षेत्रात प्रवास परवानगीविना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तब्बल ७२ दिवसांच्या विरामानंतर मुंबई, नागपूर, ठाणे, पुण्यासह शहरी भागांतील निर्बंध आज, शुक्रवारपासून शिथिल होणार असून, सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंबरोबरच इतरही खरेदी करता येईल आणि थांबलेल्या अर्थचक्राला गती मिळेल. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांनंतर आजपासून जनजीवन पूर्ववत होण्यास सुरूवात होणार आहे.

मुंबईच्या रस्त्यावरून रिक्षा-टॅक्सीही शुक्रवारपासून धावू लागतील. त्याचबरोबर मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज भासणार नाही. हळूहळू सारे व्यवहार सुरू होऊन आर्थिक गाडी रुळावर यावी, असा सरकारचा प्रयत्न आहे.

केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने टाळेबंदी ३० जूनपर्यंत वाढविताना टाळेबंदीच्या  पाचव्या पर्वात निर्बंध शिथिल करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.  ‘पुन्हा सुरुवात’ (मिशन बिगीन अगेन) या नावाने मार्गदर्शक तत्त्वे सरकारने जाहीर केली होती. यासाठी तीन टप्प्यांमध्ये दुकाने, कार्यालये, रिक्षा-टॅक्सी सुरू करण्यात येणार आहेत. बुधवारपासून व्यायामशाळांना तसेच धावणे, सायकल चालवणे याला मुभा देण्यात आली  होती, पण निसर्गवादळाने या निर्णयाची अंमलबजावणी दोन दिवस पुढे गेली. राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गुरुवारी काही सुधारणा केल्या.

राज्य सरकारने २३ मार्चपासून तर केंद्र सरकारने त्यानंतर दोन दिवसांनी टाळेबंदी लागू केली होती. तेव्हापासून मुंबई, ठाण्यासह अन्य शहरांमधील दुकाने (जीवनावश्यक वस्तू वगळता) बंदच होती. पुण्यात मात्र दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मुंबई, ठाण्यातही दुकाने काही काळ उघडी ठेवावी, ही मागणी सातत्याने करण्यात येत होती, पण रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दुकाने बंदच ठेवण्यात आली.

वाहतुकीवरील निर्बंध उठविले

मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगपालिका तसेच जिल्हाअंतर्गत प्रवासावरील निर्बंध उठविण्यात आले आहेत. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईत प्रवासासाठी किंवा नागपूरमधून अमरावती, अकोल्यात जाण्यासाठी ई-पासची गरज भासणार नाही. मुंबईहून पुण्याला जाण्याकरिता मात्र ई-पास किंवा पूर्वपरवानगी घेण्याची अट कायम आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा-टॅक्सींना मुभा

मुंबई : राज्यातील लाल क्षेत्रात शुक्र वारपासून अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा-टॅक्सी चालवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत ४० हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी, तर २ लाख रिक्षा आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षांची संख्या सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक आहे. रिक्षा, टॅक्सी, मोबाइल अ‍ॅपवर आधारित खासगी टॅक्सी आणि वैयक्तिक चार चाकी वाहनांसाठी चालक आणि दोन प्रवासी अशी अट आहे. दुचाकीवरुन फक्त चालकालाच परवानगी असल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.

येथे फायदा..

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार, मीरा-भाईंदर, नाशिक, जळगाव, धुळे, मालेगाव, अकोला, नागपूर, अमरावती, पुणे, सोलापूर, औरंगाबाद महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, पालघर नगरपालिका.

नव्या आदेशानुसार.. मॉल आणि व्यापारी संकुले वगळताअन्यत्र सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने पी-१ व पी-२ यानुसार म्हणजेच सम आणि विषम तारखेनुसार उघडली जाणार असून ती नियमित वेळेत म्हणजेच सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत किंवा पालिकेने गरजेनुसार ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरू राहतील.

सोमवारपासून कार्यालये सुरू

सर्व खासगी कार्यालये क्षमतेच्या १० टक्के किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) यांच्यासह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर कर्मचाऱ्यांना मात्र घरून काम करावे लागेल. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांना शिक्षणाशिवाय अन्य शिक्षणाशी संबंधित कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामध्ये उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन आणि निकाल जाहीर करणे आदी कामे करता येतील.

हे सुरू..

पहिल्या टप्प्यात सार्वजनिक व खासगी मैदाने, सार्वजनिक ठिकाणे, समुद्रकिनारे, उद्याने या ठिकाणी अंतरनियम पाळून  व्यायाम, जॉगिंग, धावणे, सायकल चालविण्यास पहाटे ५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सामूहिक व्यायाम किं वा बंदिस्त प्रेक्षागृहात व्यायाम किं वा अन्य कोणत्याही कसरती करण्यास प्रतिबंध कायम ठेवण्यात आला आहे. तसेच व्यायामाचे कोणतेही साहित्य, उद्यानातील खुल्या व्यायामशाळा किंवा उद्यानातील व्यायाम साहित्याचा वापर करता येणार नाही.  प्लंबर, विद्युतदुरुस्ती, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सर्व नियम पाळून कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये वेळ घेऊन गाडीदुरुस्ती करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालये आवश्यकतेनुसार १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. याची सुरुवात मुंबईबाहेर झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restrictions in cities relaxed from today abn
First published on: 05-06-2020 at 00:33 IST