‘लोकसत्ता’तर्फे  सुरू करण्यात आलेल्या ‘सर्वकायेषु सर्वदा’ या सामाजिक उपक्रमाला यंदाही दानशूर वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयात अद्यापही वाचकांच्या मदतीचा ओघ अव्याहत सुरू असून गोव्यातील निवृत्त प्राध्यापक एस. एस. नाडकर्णी यांनी या उपक्रमासाठी ‘लाख’मोलाची देणगी दिली आहे.
प्रा. नाडकर्णी यांनी चार संस्थांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे धनादेश दिले आहेत. यापैकी तीन धनादेश त्यांनी आपल्या आईवडिलांच्या म्हणजे सदाशिव सीताराम नाडकर्णी व ताराबाई सदाशिव नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ डोंबिवली येथील ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’, नाशिक येथील ‘प्रबोधिनी ट्रस्ट’ आणि चिंचवड येथील ‘झेप पुनर्वसन केंद्र’ या संस्थांना दिले आहेत. चौथा धनादेश त्यांनी आपले मित्र, संगीताचार्य डॉ. अशोक दामोदर रानडे यांच्या स्मरणार्थ ‘पुणे भारत गायन समाज’ या संस्थेला दिला आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ उल्लेखनीय समाजकार्य करीत असून, यात आपण खारीचा वाटा उचलत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ‘लोकसत्ता’ने समाजातील विविध क्षेत्रांत धडाडीने कार्य करणाऱ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातील १० निवडक सामाजिक संस्थांचा वाचकांना परिचय करून दिला होता. ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या या उपक्रमाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद तर दिलाच, पण अनेकांनी या संस्थांना आर्थिक मदतीचा हातही दिला. समाजात दानशूर हातांची आजही कमतरता नाही, हे या प्रतिसादाने दाखवून दिले आहे.