मुंबई : निवृत्तीनंतर मुंबईत हक्काचे घर असावे असे स्वप्न बघणाऱ्या निवृत्त शिक्षकाची तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. एका दलालाने कांदिवली येथील एका आलिशान इमारतीमधील सदनिकला दाखवली आणि तोतया मालक उभा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिकेचा व्यवहार करून ही फसवणूक केली. तक्रारदार निवृत्त शिक्षक आहेत. ते सध्या मिरा रोड येथे राहतात.
निवृत्तीनंतर मुंबईत हक्काचे घर असावे असे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी ते मुंबईत घराचा शोध घेत होते. त्यांना जून २०२५ रोजी रवींद्र सिंग नामक दलाल भेटला. त्याने कांदिवली येथील लोखंडवाला परिसरात लोडावुडस नावाच्या टॉवरमधील १५ व्या मजल्यावर गणेशप्रसाद चतुर्वेदी यांची एक सदनिका विक्रीसाठी असल्याचे सांगितले. तक्रारदार शिक्षकाला ती सदनिका आवडली. त्यानंतर सिंग याने सदनिकेचा मालक गणेशप्रसाद चतुर्वेदी याच्याशी ओळख करून दिली. या सदनिकेची किंमत १ कोटी २१ लाख ५४ हजार रुपये ठरली. मालक चतुर्वेदी याने घराची कागदपत्रे सादर केली. त्यानंतर घराचा व्यवहार करण्यात आला. मुंबईत आपल्या नावाचे हक्काचे घर झाले असे चौधरी यांना वाटत होते.
‘तो’ मालक तोतया, घराच्या नावाने फसवणूक
घराचा ताबा देण्यासाठी तक्रारदार दलाल सिंग आणि मालक चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधत होते. सुरवातील त्यांनी टाळाटाळ केली, नंतर मात्र दोघांनी संपर्क तोडला. तक्रारदार शिक्षकाने चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. ती सदनिका चतुर्देवी यांची असली तर मालक तोतया होता. दलाल रवींद्र सिंग याने एक चतुर्वेदी नावाचा तोतया मालक समोर उभा केला आणि ती सदनिका त्याच्या मालकीची असल्याचे भासवून तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दलाल रवींद्र सिंग आणि तोतया इमसामाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९ (२), ३१८ (४), ३१६ (२), ३३६ (३०) आणि ३३८, तसेच ६१ अन्वये बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
