मुंबई : आपल्या कामातून निःस्वार्थीपणे दुसऱ्याला जगण्याची आशा देणाऱ्या आणि भारतीय आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या लाखो आशा सेविकांची कथा अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणाऱ्या दीपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’ या मराठी चित्रपटाने ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार पटकावले आहेत. या चित्रपटातील ‘मालती’ या मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता प्रसाद ओक यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.
‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याचा प्रचंड आनंद आहे. आशा सेविकांची निळी साडी घालणे, गळ्यात बॅग व हातात सायकल असे चित्रीकरणाचे दिवस पुन्हा आठवले आणि खूप भारी वाटले. महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार आणि सर्व आशा ताईंना लव्ह यू’, अशा भावना अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने व्यक्त केल्या.
धैर्य, आशा, दुःख आणि आनंद या सर्व भावनांची गुंफण ‘आशा’ या चित्रपटात केली आहे. या चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन दीपक पाटील यांनी केले असून दैवता पाटील, दीपक पाटील आणि निलेश कुवर यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. तर पटकथा व संवाद अंतरीक्ष श्रीवास्तव आणि निलेश देशपांडे, गीतलेखन वलय मुळगुंद आणि संगीत आशिष झा यांचे आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत असून उषा नाईक, सुहास शिरसाट, शुभांगी भुजबळ, राजश्री निकम, साईंकित कामत, दिशा दानडे, रुपेश खरे, दिलीप घारे, हर्षा गुप्ते हे कलाकार चित्रपटात झळकत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
‘अनेकदा आपल्याला निरनिराळे विषय सुचतात, परंतु आशा चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर मला सर्वात जास्त समाधान आहे. आशा सेविकांचे काम हे देशभर पसरलेले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून आशा सेविकांचे काम हे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, अशी मला आशा आहे. आता या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चार विविध पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. सर्व सन्माननीय परीक्षक आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे मनःपूर्वक आभार. हे पुरस्कार उत्साह वाढवणारे आहेत. आता हा चित्रपट प्रत्येक गावातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची ‘आशा’ करूया’, असे दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले.
‘संपूर्ण देशभरात जवळपास १० लाख आशा सेविका तसेच बहुसंख्य एएनएस परिचारिका देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सेवेचे अविरत काम करतात. पण त्यांचे कष्ट आजवर तितकेसे प्रकाशझोतात आलेले नव्हते. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचे कष्ट सर्वांपर्यंत पोहोचतील, अशी आशा करते. या पुरस्काराच्या माध्यमातून सर्व आशा भगिनींच्या कार्याचा शासनाने उचित सन्मान केलेला आहे’, असे निर्मात्या दैवता पाटील यांनी सांगितले.
६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा
‘आशा’ चित्रपटाला मिळालेले पुरस्कार
१) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रिंकू राजगुरू – आशा
२) सर्वोत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट – आशा
३) सर्वोत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – दीपक पाटील – आशा
४) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उषा नाईक – आशा