मुंबई : मुंबईतील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर असून या सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत पूर्ण करावीत. तसेच, कॉंक्रिटचे रस्ते वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावेत. त्याचसोबत इतर रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी पुनर्पृष्ठिकरण करावे. तसेच नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पावसाळ्यात सुरू राहतील अशा प्रकारची रस्ते काँक्रिटीकरणाची कोणतीही नवीन कामे हाती घेऊ नयेत, असे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना दिले.

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ३९८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यापैकी, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात मिळून ३२५ किलोमीटर अंतरापैकी काही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. तर, शहर विभागातील एक निविदा रद्द करण्यात आली आहे. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पातील निविदेच्या अटीनुसार, सर्व रस्ते वाहतूकयोग्य स्थितीत ठेवावेत, आवश्यक तेथे अपूर्ण रस्त्यांचे पुनर्पृष्ठिकरण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणत: ३० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. जर प्राधान्याने रस्ते पूर्ण करण्याकडे लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यादरम्यान काँक्रिट रस्त्यांची कामे अपूर्ण राहतात. परिणामी, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही परिस्थितीत सध्या सुरू असलेली सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अन्यथा कंत्राटदार व अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल, असेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

हेही वाचा – गणेशोत्सव कालावधीतील रेल्वे आरक्षण शनिवारपासून सुरू होणार

पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर दुरुस्ती योग्य ठिकाणी डागडुजीकामी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचीही लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे. पावसाळापूर्व कामांचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून महानगरपालिका प्रशासनाने दोष दायित्व कालावधीत समाविष्ट नसलेल्या विविध रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी करणाची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी ७ परिमंडळांत एकूण १४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबई : परिचारिकेला मारहाण केल्याच्या निषेधार्थ भाभा रुग्णालयात आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती

खड्ड्यांसंदर्भातील तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी यंदा मुंबईमधील महापालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दुय्यम अभियंते प्रभागात प्रत्यक्ष फिरून खड्डयांसंदर्भात तक्रारीची स्वतःहून नोंद घेतील. तसेच तक्रार प्राप्त झाल्यानंतर परिमंडळनिहाय नेमलेल्या कंत्राटदारामार्फत मास्टिक अस्फाल्टने खड्डे बुजविण्यात आले आहेत का, याची दुय्यम अभियंते खातरजमा करतील. रस्ते दुरुस्ती वेळेत होते का, तसेच नागरिक, लोकप्रतिनिधी, माध्यमे व समाजमाध्यमे यांच्याद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.