मुंबई : वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास रस्ता खचल्याची घटना घडली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर या मुख्य रस्त्याला चांगलेच भगदाड पडले आहे. विभाग कार्यालयाने हे भगदाड तात्पुरते बंद करून सुरक्षित केले असले तरी जमिनीखाली पोकळी का तयार झाली त्याचे कारण शोधून उपाययोजना करण्याचे अद्याप बाकी आहे.

वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोड येथे नॅशनल कॉलेजच्या समोरच्या रस्त्यावर एक मोठे भगदाड पडले. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. जमिनीखाली मोठी पोकळी निर्माण झाली असून सहा फूट रुंद आणि सहा फूट लांब व तितकाच खोल असा खड्डा या ठिकाणी पडला आहे. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयाने या ठिकाणी खड्ड्याभोवती रस्ता रोधक उभे केले आहेत.

याबाबत एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रस्ता कोणत्या कारणामुळे खचला त्याचे अद्याप कारण शोधण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर त्यावर उपाययोजना केली जाईल. मात्र तात्पुरती उपाययोजना करून रस्ता बंद करून सुरक्षित करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी रस्ता रोधक उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या भागातून आधीच मायक्रो टनेलिंगचे काम सुरू असून त्यामुळे हा रस्ता खचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रस्ते विभागाला याबाबत कळवण्यात आले असून जमिनीखाली पोकळी का निर्माण झाली याबाबत एक – दोन दिवसांत कारण शोधून त्यावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

लिंकिंग रोड हा नेहमीचा वर्दळीचा मार्ग असून विसर्जनाला जाणाऱ्या मिरवणूकांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे. मात्र रस्ता खचला तो भाग कडेला असून दोन झाडांच्या मध्ये आहे. त्यामुळे धोका नसल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

लिकिंग रोड की सिकिंग रोड? नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

रस्ता खचल्याची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत असून त्यावर नागरिकांनी मुंबई महापालिकेवर खूप टीका केली आहे. हा लिकिंग रोड नाही हा सिंकिंग रोड आहे, अशी इंग्रजी भाषेतील टिप्पणीही अनेकांनी केली आहे. पालिका मुख्यालयाकडे जाण्यासाठी शार्ट कट…, टनेल्ससाठी टनेल …..मुंबईतील रस्ते बनवण्याचे खास तंत्रज्ञान अशी खोचक टीकाही समाजमाध्यांवर केली जात आहे.