मुंबई : रस्त्याच्या रुंदीकरणासाठी झाडे हटवण्यावरून पर्यावरणवादी मंडळी कायमच पालिकेवर टीका करीत असतात. मात्र आरे कॉलनीत एकही झाड न कापता रस्त्याचे बांधकाम करण्याचा संकल्प पालिकेने केला आहे. विकासकामांच्या आड येणारी झाडे हटविण्यासाठी त्यावर नोटिसा लावण्यात येतात. मात्र यंत्रणेने मनात आणले तर एकही झाड न कापताही विकासकाम कसे होऊ शकते याचे उदाहरण पालिकेनेच दिले आहे.

आरे वसाहतीतील दिनकरराव देसाई मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले असून एकही झाड न कापता या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे पालिकेने ठरवले आहे. जानेवारी महिन्यात या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून अजून दोन वर्षांनी हा रस्ता नागरिकांना उपलब्ध होणार आहे. साधारण ७.१ कि.मी. लांबीचा हा मुख्य रस्ता असून गेली अनेक वर्षे हा रस्ता आरे वसाहत प्रशासनाच्या ताब्यात होता. या रस्त्याची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जाणे-येणे त्रासाचे होत होते. आरे प्रशासनाने नुकताच हा रस्ता पालिकेला हस्तांतरित केला आहे. पालिकेच्या रस्ते विभागाने या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याच्या कामासाठी ३८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. 

वन्यप्राण्यांसाठी १८ भूमिगत मार्ग

आरे वसाहत हा घनदाट जंगलाचा भाग असून अनेक वेळा वन्यप्राणी हा रस्ता ओलांडून जंगलातून ये-जा करीत असतात. त्यामुळे त्यांना येण्या-जाण्यासाठी या रस्त्यावर १८ ठिकाणी भूमिगत मार्ग तयार करण्यात येणार आहेत. वन्य विभागाच्या मदतीने त्याचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती उल्हास महाले यांनी दिली. कोणत्या प्राण्याचा जाण्याचा मार्ग कुठून कुठपर्यंत आहे याची माहिती वन विभागाला असते. या माहितीच्या आधारे हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आल्याचेही महाले यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रस्त्याची रुंदी ७ ते ९ मीटर आहे. काही ठिकाणी या रस्त्याच्या रुंदीआड झाडे येत होती; पण एकही झाड न कापता रुंदी जैसे थे ठेवून या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. -उल्हास महाले, उपायुक्त, पायाभूत सुविधा