लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: ‘दहिसर- गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील रस्ता खाचला असून या रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. परिणामी, महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) सुरक्षेच्या दृष्टीने उत्तरेकडील प्रवेशद्वार बंद केले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

‘मेट्रो ७’ मार्गिकेवरील मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील रस्त्यावर खासगी विकासकांच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामासाठी विकासकाने मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले आहे. या कामादरम्यान नुकताच रस्ता खचला. मुंबई महानगरपालिकेने खचलेला रस्ता तात्काळ वाहतुकीसाठी बंद केला. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्याजवळील मागाठाणे मेट्रो स्थानकातील उत्तरेकडील प्रवेशद्वार बंद करण्याची सूचना एमएमएमओसीएलला केली होती. त्यानुसार मागाठाणे मेट्रो स्थानकातील उत्तरेकडील प्रवेशद्वार मंगळवारी बंद करण्यात आले. एमएमएमओसीएलने ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-मुंबई: वाहनांचे सुटे भाग चोरून विकणारे दोघे गजाआड

उत्तरेकडील प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने आता प्रवाशांना इतर पर्यायी प्रवेशद्वारांचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची काहीशी गैरसोय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महानगरपालिका जोपर्यंत हा रस्ता पूर्ववत करीत नाही तोपर्यंत हे प्रवेशद्वार बंदच राहणार आहे.