मुंबई : मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी काही ठिकाणचे सखलभाग जलमय झाले होते. त्याचा मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला. त्याचा फटका सोमवारी सकाळी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना बसला.

मुंबईत रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी अंधेरी भुयारी मार्गावर परिणाम झाला. कर्नाक पूल बंद असल्याने दक्षिण दिशेने जाणाऱ्या अवतार सिंग बेदी वाडीबंदर या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. तेथेही पाणी साचले होते. दुपारनंतर पाणी कमी झाल्यानंतर तेथील वाहतूक पूर्ववत झाली. याशिवाय सोमवारी सकाळी पूर्व मुक्त मार्गावरील दक्षिण वाहिनीवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. मलबार हिल परिसरातील नारायण दाभोळकर मार्गावरही पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. याशिवाय परळ येथील एल्फिन्स्टन पुलावरही पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, दक्षिणेकडे जाणाऱ्या सिबा मार्ग येथील वाहतूक संथगतीने सुरू होती. अंधेरी मार्केट, जे. जे. पूल येथील वाहतूक मंदावली होती. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली.

मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी वरळी नाका उत्तर वाहिनी, वांद्रे बँड स्टँड, जे. जे. मार्ग, हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, वाकोला राम नगर सब-वे येथे पाणी साचले होते. त्यामुळे या परिसराला जोडणाऱ्या मार्गिकांवरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. याशिवाय दादर येथे इलेक्ट्रीक बस बंद पडली होती. त्यामुळे दादर येथील टिळक पुलावरील दक्षिण वाहिनीवरील वाहतुकही धीम्या गतीने सुरू होती. याशिवाय पश्चिम उपनगरातील अंधेरी ब्रीज काईंब (सहार) येथेही सिमेंट मिक्सर बंद पडल्यामुळे उत्तरेकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दोन्ही वाहने तासाभरात तेथून हटवल्यानंतर या परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू झाली. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला होता. मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून पाऊस पडत होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्यावर उतरून पोलिसांनी केली मदत

दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसानंतर मुंबई पोलिसांनी रस्त्यावर उतरून मुंबकरांना मदत केली. माटुंगा परिसरात पावसामुळे मोटरगाडी बंद पडली होती. पोलिसांनी मोटरगाडी चालकाला तेथून वाहन हटवण्यात मदत केली. त्यावेळी तेथे पाणी साचले होते. अंधेरी, माटुंगा, खार, दादर, माटुंगा येथील काही भागात पाणी साचले होते. पोलिसांनी रस्तावर उतरून नागरिकांना वाट दाखवत होते. तसेच वाहनचालकांनाही मदत करीत होते. जे.जे. मार्ग येथेही पाणी साचले असताना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस नागरिकांना मदत केली. यावेळी पोलीस ठाण्यासमोरही पाणी साचले होते.