मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामासाठी ३३.५ किमी लांबीच्या मार्गात उभारलेले रस्ता रोधक (बॅरिकेट्स) दोन टप्प्यात हटविण्याचा निर्णय घेतला आहे. जूनपर्यंत ४४ रस्ते, तर सप्टेंबरपर्यंत ४९ रस्ते रस्ता रोधकमुक्त करण्यात येणार आहेत. परिणामी, ‘मेट्रो ३’च्या कामामुळे मुंबईकरांना सहन कराव्या लागणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>सलग दुसऱ्यांदा मुंबईला ’जागतिक वृक्षनगरी’ बहुमान; जगातील वृक्षसंपदा समृद्ध शहरांमध्ये समावेश
‘मेट्रो ३’चे काम २०१६ मध्ये सुरू करण्यात आले. या कामासाठी ३३.५ किमी लांबीच्या मार्गात रस्ता रोधक उभारण्यात आले असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. जानेवारी २०१७ पर्यंत आवश्यक ते सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तर काही रस्त्यांवरून एक दिशा वाहतूक सुरू ठेवण्यात आली. परिणामी, वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला असून मागील सहा-सात वर्षांपासून मुंबईकरांना त्याची झळ बसत आहे. मात्र आता कुलाबा – सीप्झ दरम्यानच्या सर्व रस्त्यांवरील रस्ता रोधक सप्टेंबरपर्यंत हटविण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएमआरसी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यानच्या काळात ‘एमएमआरसी’ने रस्ता रोधक हटवून रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली आहे. धारावी येथील नयानगर येथे टीबीएम यंत्र भूगर्भात सोडण्यासाठी भली मोठी विहीर खोदण्यासाठी आणि सर्व कामे करण्यासाठी रस्ता रोधक उभारून रस्ते बंद करण्यात आले होते. या रस्त्यांवरील रस्ता रोधक जानेवारीत हटविण्यात आले. विधान भवन परिसरातील व्ही. व्ही. मार्गही नुकताच मोकळा करण्यात आला आहे.
जसजसे काम पूर्ण होईल तसतसे जूनपर्यंत ४४ रस्ते अडथळे मुक्त करण्यात येणार आहेत. यात कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, महालक्ष्मी, सिद्धिविनायक, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, सहार, टर्मिनल १, मरोळ नका, एमआयडीसी, आणि सीप्झ येथील रस्त्यांचा समावेश आहे. तर सप्टेंबरपर्यंत ४९ रस्ते मोकळे होणार आहेत. यात कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, दादर, शितलादेवी येथील रस्त्यांचा समावेश आहे. हे सर्व रस्ते मोकळे झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.