मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जाॅर्डनमधील क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्सची नवीन थेट विमानसेवा सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान आठवड्यातून चार वेळा विमान सेवा असेल. त्यामुळे भारत आणि जाॅर्डनमधील प्रवास अधिक सुखद आणि सुरक्षित होईल.
जाॅर्डनमध्ये पेट्रा हे प्राचीन शहर, मृत समुद्र व इतर अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. त्यामुळे भारतातून जाॅर्डनला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. जाॅर्डनमधील सर्वात मोठे क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई विमानतळाला जोडणारी रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्सची थेट विमान सेवा सुरू झाल्याने भारतीय पर्यटकांना लाभ होणार आहे.
मुंबईहून सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी जाॅर्डनसाठी रॉयल जॉर्डनियन एअरलाइन्सची विमान सेवा उपलब्ध असेल. मुंबईहून प्रवाशांना केवळ जॉर्डनच, नव्हे तर मध्य पूर्व, युरोप, उत्तर आफ्रिका, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामधील ५० हून अधिक ठिकाणी जाण्यासाठी विमान सेवा उपलब्ध आहे. इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध असलेल्या जॉर्डनमध्ये विमान सेवेने थेट प्रवास करता येणार आहे, असे रॉयल जॉर्डनियनचे मुख्य व्यावसायिक अधिकारी करीम मखलौफ यांनी सांगितले.