जागतिक अर्थचिंता, देशी बँकांच्या कमजोर कामगिरीने खळबळ; समभाग मूल्य घरंगळले
जागतिक अर्थप्रतिकूलता असताना, देशांतर्गत अर्थ दशदिशाही वळणावर आली नसल्याचे दाखविणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बडय़ा बँकांच्या निराशाजनक तिमाही कामगिरीने गुरुवारी मुंबई शेअर बाजारात उत्पात घडविला. प्रामुख्याने विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू केल्याने सेन्सेक्सने ८०७.०७ अंश अशी आजवरची आठवी मोठी गटांगळी घेतली. यातून सेन्सेक्स २३,००० अंशांखाली, तर निफ्टीनेही २३२.३० अंश घसरणीने ७,००० ही महत्त्वाची पातळी तोडली.
स्टेट बँकेने निव्वळ नफ्यात ६२ टक्के, युनियन बँकेने ७४.५ टक्के घसरण दाखवली तर बँक ऑफ इंडियाला तब्बल १,५०५ कोटी रुपयांच्या विक्रमी तोटय़ाचा तडाखा बसल्याने बाजारात खळबळ उडाली. या बँकांच्या बुडीत कर्जातही (एनपीए) लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी प्रमुख बँकांच्या समभागांमध्ये विक्रीचा जोर वाढल्याने त्यांचे मूल्य दोन ते ११ टक्क्यांपर्यंत घरंगळले.
सलग चौथ्या दिवशी राहिलेल्या घसरणीने सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही मुख्य निर्देशांकांनी महत्त्वाच्या पातळ्या गमावल्या. इतकेच नव्हे निर्देशांकांनी ९ मे २०१४ पूर्वीच्या पातळीवर फेर धरल्याचे गुरुवारी दिसून आले. देशात सत्तांतरानंतरच्या उत्साही ‘मोदी तेजी’तून साधलेली सेन्सेक्समधील २३ टक्क्यांची वाढ गेल्या काही दिवसांतील घसरणीने पूर्ण धुवून काढली. सेन्सेक्सने गतवर्षी ४ मार्च रोजी ३०,०२४ अंशांच्या सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घातली होती. गुरुवारच्या पडझडीने तब्बल ३.१३ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीचा नाश केला. वर्षभरात २० लाख कोटी रुपयांची गुंतवणूकदार मत्ता मातीमोल झाली आहे. यात सरकारी बँकांच्या समभागांनी सर्वाधिक तब्बल दोन लाख कोटी रुपयांहून अधिक बाजारमूल्य गमावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शस्त्रक्रिया अटळ’
या समस्येवर खोल शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले. या शस्त्रक्रियेच्या वेदना सुसह्य़ व्हाव्यात यासाठी रोग्याला भूल द्यायला हवी. यासाठी बँकांनी कर्जे बुडण्याची शक्यता दिसताच, त्यांची पुस्तकी नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rs 1 14 lakh crore of bad debts the great government bank write off
First published on: 12-02-2016 at 02:36 IST