मुंबई : देशाच्या लोकसंख्येतील बदलते कल (धार्मिक गुणोत्तर) चिंताजनक बाब असून त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यास करुन आपण पुढे जायला हवे आणि तुमचा विश्वास कशावर आहे, हे अत्यंत महत्वाचे आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवारी येथे केले.

देशाच्या फाळणीच्या स्मृतीदिनानिमित्ताने राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) तर्फे आंबेकरांच्या उपस्थितीत ‘डेमोग्राफी इज डेस्टिनी’ या माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. भारताच्या लोकसंख्येतील शास्त्रीय कल, धार्मिक आधारावर लोकसंख्येचे बदलते गुणोत्तर आणि या बदलांमुळे उद्भवणाऱ्या सामाजिक-राजकीय परिणामांचा सखोल शोध या माहितीपटात घेण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कामाख्या नारायण सिंह हे माहितीपटाचे दिग्दर्शक असून रवींद्र संघवी निर्माते आहेत.

या माहितीपटाच्या प्रदर्शनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आंबेकर म्हणाले, देशावर १२०० सालानंतर झालेल्या आक्रमणांमुळे आपले फार नुकसान झाले, जहाल विदेशी आक्रमकांनी येथील प्राचीन संस्कृतीवर जबरदस्त आघात केला आणि पर्यायाने भारतातील लोकसंख्येतील गुणोत्तर बदलण्यास सुरुवात झाली. उदाहरणच द्यायचे झाले तर, लेबनानमधील बहुसंख्य लोकसंख्या आधी ख्रिश्चन होती आणि आता हा देश बहुसंख्यांक मुस्लिम झाला आहे. पूर्वी पारश्यांचा असलेला पर्शिया देश म्हणजेच आत्ताच्या इराणमध्ये पारशी औषधाला देखील सापडत नाही.

यावेळी टिसचे कुलगुरु प्रा. बद्री नारायण तिवारी यांनी समाजात होणाऱ्या बदलांवर भाष्य केले. लोकसंख्येतील बदलत्या कलांचा विपुल अभ्यास आवश्यक असल्याचे नमूद केले. लोकसंख्येतील बदलांमुळे आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. हिंदू समाज विकासाचा विचार प्रकर्षाने करतो, परंतु दुर्दैवाने संस्कृतीचा विचार करीत नाही, असे तिवारी यांनी नमूद केले.

‘ डेमोग्राफी इज डेस्टिनी ’ या माहितीपटातील प्रमुख मुद्दे :-

  • १८८१ मध्ये झालेल्या भारताच्या पहिल्या जनगणनेत बहुसंख्य समुदायाची संख्या ८२ टक्के
  • १९४१ पर्यंत आणि फाळणी व पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत कमी झाले होते.
  • फाळणीनंतर १९५१ च्या जनगणनेत बहुसंख्यांची संख्या ८४ टक्क्यांपर्यंत वाढली, परंतु २०११ पर्यंत, ही संख्या पुन्हा ७९टक्क्यांपर्यंत घसरली.

-अंदाजानुसार पुढील १२०-१३० वर्षात बहुसंख्यांकांच्या लोकसंख्येचे प्रमाण आणखी कमी होऊन ६७ टक्क्यांपर्यंत घसरु शकते

या माहितीपट काश्मीर खोरे, लडाख, जम्मू, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल आणि आसाम यासारख्या प्रदेशांमधील लक्षणीय लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर भाष्य करण्यात आले आहे. तेथे मुस्लिम लोकसंख्या १४ टक्क्यांवरुन ४२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्याचे कारण बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीमध्ये दडले आहे. मेरठ, मुरादाबाद, सहारनपूर आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील इतर जिल्ह्यांमध्येही असेच कल दिसून येत आहेत.

घुसखोरी, पलायन, धर्मातर आणि हिंदूंमध्ये घटणारा प्रजनन दर यासारख्या संवेदनशील सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर या माहितीपटामध्ये लक्ष वेधण्यात आले आहे. युरोप आणि अमेरिकेतील लोकसंख्याशास्त्रीय बदल, वाढती इस्लामिक लोकसंख्या आणि सांस्कृतिक बदल, उशिरा होणारे विवाह, कुटुंबाचे आकार कमी होत जाणे, पाश्चिमात्य देश आणि भारतात घटत्याजन्मदराला कारणीभूत ठरणाऱ्या सामाजिक मूल्यांमध्ये बदल याविषयी माहितीपटामध्ये निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत.

लोकसंख्येचे संतुलन ढळल्याने जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात अस्थिरता

जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात लोकसंख्येचे संतुलन ढळल्याने अस्थिरता निर्माण होऊन चळवळी सुरु झाल्या. करोडो रुपयांचे नुकसान झाले. प्रत्येक देशातील बहुसंख्यांकांच्या लोकसंख्येनुसार एक ओळख असते. ती त्यांच्या प्रथा व परंपरांशी जुळणारी असते. ज्या देशांनी आपल्या लोकसंख्येची मूळ ओळख कायम राखली, त्या देशांमध्ये सुखशांती नांदत आहे व विकासही साधला जात आहे. पण ज्या देशांमध्ये लोकसंख्येचे गुणोत्तर बदलले, तेथे अस्थिरता व अराजक निर्माण झाले. देशाच्या इतिहासातही लोकसंख्या बदलाचा मोठा आयाम आहे. आपल्या धर्मानुसार पूजापद्धती कोणतीही असो, पण सर्वांसाठी वाहतुकीचे नियम ज्याप्रमाणे सारखेच असतात, त्याचप्रमाणे सर्वांसाठी समान नियम, हाच धर्म आहे, असे प्रतिपादन आंबेकर यांनी केले.