मुंबई : आरटीओ विभागातील कार्यान्वित झालेल्या आकृतीबंधाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत गेल्या काही वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतर पदरी केवळ आश्वासने पडल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आकृतीबंधाची अंमलबजावणी न करताच महसूल विभागीय बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याने संघटनेने ऑक्टोबर २०२४ मध्ये तीन दिवस लढा उभारला होता. त्यामुळे परिवहन आयुक्तांनी एक महिन्यात सर्व सेवा प्रवेश नियम मंत्रालयस्तरावर तयार करून घेण्याचे व पदोन्नतीसह इतर सर्व मागण्याही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे संघटनेने संप स्थगित केला होता. मात्र प्रलंबित मागण्यांबाबत वर्षभरात कोणतीच ठोस कार्यवाही करण्यात आली नाही.
कालबद्ध पदोन्नती व विभागीय पदोन्नती आदेश तातडीने जारी करण्याचे आश्वास परिवहन आयुक्तांनी परिवहन मंत्र्यांसमोर दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने संघटनेने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने सांगितले.
