माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ‘कॉलेज ऑफ एक्सलन्स’ हा बहुमान देण्यात आला आहे. हा बहुमान मिळवणारे हे देशातील पहिले महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या भविष्यातील विकासासाठीही आयोगातर्फे दोन कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा, सोयी-सुविधा, समाजाभिमुखता, भविष्यातील योजना अशा विविध निकषांवर आयोगाने देशभरातील महाविद्यालयांकडून या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले होते. यासाठी आलेल्या शेकडो प्रस्तावांतून रुईयाची निवड झाली आहे. यातील प्रमुख निकष नॅक मानांकनात महाविद्यालयाला ३.५पेक्षा जास्त गुणांक आवश्यक आहे, हा होता. या महाविद्यालयाला ३.६५ गुणांक आहेत.
नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम, विद्यापीठ गुणवत्ता यादीत अग्रक्रम, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, संशोधन क्षेत्र अशा विविध पातळय़ांवर महाविद्यालयाची बाजू जमेची ठरल्यामुळे हा बहुमान मिळणे अधिक सोपे झाल्याचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. हा दर्जा महाविद्यालयाला १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीसाठी मिळाला आहे. महाविद्यालयाच्या भविष्यकालीन विस्तारात शाश्वत विकास ही संकल्पना अग्रभागी ठेवून दर्जेदार शिक्षण, सुविधा निर्मिती व संशोधन यावर भर देण्यात येणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. महाविद्यालयाने स्वायत्ततेसाठी अर्ज केला असून तीही लवकरच मिळेल, अशी आशा व्यक्त करीत महाविद्यालयाचा प्रवास खासगी विद्यापीठापर्यंत नेण्याचे स्वप्न असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
महाविद्यालयाची वैशिष्टय़े
* ५९ पदवी अभ्यासक्रम, ६०० हून अधिक पीएच.डी.धारक. १२ हून अधिक विषयांत पीएच.डी. सुविधा.
* पाच पेटंट्स
* विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे विशेष अनुदान
* अनुदान आयोगाचा ‘कॉलेज इन पोटेन्शिअल फॉर एक्सलन्स’ हा सन्मान
* जैवतंत्रज्ञान विभागाकडून ‘स्टार कॉलेज स्कीम’मध्ये निवड
* क्रीडा, कला क्षेत्रात कामगिरी
* धारावीमधील शिक्षण अपूर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न
* अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष विभाग.
* रुईया महाविद्यालयाचा पहिला इंटरनेट रेडिओ