मुंबई: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे गुरुवारी रुपया ८४ पैशांनी घसरून प्रति डॉलर ८५.६१ पातळीवर बंद झाला. एका सत्रातील तब्बल १ टक्क्यांच्या घरातील ही अलिकडच्या काळात चलनातील मोठी घसरण आहे. याच अस्वस्थतेतून झालेल्या समभाग विक्रीने गुरुवारी शेअर बाजारात सेन्सेक्स देखील ४१२ अंशांनी घसरला. 

एकंदर वित्त बाजारावर चिंतेची छटा वाढली असल्याचे डॉलरच्या तुलनेत ८४ पैसे म्हणजे तब्बल १ टक्क्यांनी गडगडलेल्या रुपयाच्या मूल्यानेही हे दाखवून दिले. पाकिस्तानी सैन्याच्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर बुधवारी रात्री केलेला हल्ला भारतीय सैन्याने निष्प्रभ केला. तरी गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्याचा प्रयत्न म्हणून सावध पवित्रा घेतल्याचे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले. वाढलेले भू-राजकीय धोके, सकारात्मक अमेरिकन डॉलर निर्देशांक आणि खनिज तेलाच्या किमतीत वाढ याचाही रुपयाच्या मूल्यावर नकारात्मक परिणाम दिसून आला.

आंतरबँक परकीय चलन बाजारात, भारतीय चलन डॉलरच्या तुलनेत १०० पैशांच्या नुकसानीसह ८५.७७ च्या नीचांकी पातळीवर ढासळले होते. तेथून ते सावरले तरी मागील बंद पातळीपेक्षा ८४ पैशांची घसरणीसह ते बंद झाले. बुधवारी देखील पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर भारताच्या लष्करी हल्ल्यांनंतर, रुपया डॉलरच्या तुलनेत ४२ पैशांनी घसरून ८४.७७ वर बंद झाला होता. पहलगाम हल्ल्याला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर बुधवारी त्याची सकारात्मक प्रतिक्रिया  शेअर बाजारात उमटली होती आणि सेन्सेक्स १०५.७१ अंशांनी आणि निफ्टी ३४.८० अंशांनी वाढला होता.