महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शाही विवाहाचा घाट घातल्याबद्दल राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांनी पक्षश्रेष्ठींची नाराजी ओढवून घेतली असतानाच, आपल्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा भपकेबाज घाट शनिवारी राष्ट्रवादीचेच राज्यमंत्री सचिन अहिर यांनी घातल्याने पक्षातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भव्य रोषणाई, तारे-तारकांची हजेरी, सहकारी मंत्र्यांची उपस्थिती आणि परिसर दुमदुमून टाकणारी कर्णकर्कश गाणी असे शाही वातावरण सचिन अहिर यांनी वरळीच्या जांबोरी मैदानावर निर्माण केले. निमित्त होते, त्यांच्या कार्य-अहवालाच्या जंगी प्रकाशन सोहळ्याचे..विवाह सोहळ्यानिमित्त कोटय़वधींची उधळण करीत दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला खिजविणाऱ्या जाधवांच्या जेवणावळींपाठोपाठ अहिर यांच्या अहवाल प्रकाशनातूनही भपकेबाजपणाचे नवे दर्शन घडल्याची चर्चा वरळी परिसरातच सुरू होती.
दुष्काळात होरपळणाऱ्या राज्याचे मंत्री असलेले भास्कर जाधव यांच्या घरच्या शाही विवाह सोहळ्याची दृश्ये पाहून पक्षाध्यक्ष शरद पवार यांना झोप लागली नव्हती. हे प्रकरण ताजे असतानाच राज्याचे गृहनिर्माण आणि पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी कार्य-अहवालाच्या प्रकाशनाचा पंचतारांकित सोहळा आयोजित केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेले वरळीमधील जांबोरी मैदान या कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आले. या मैदानासाठी दररोज २५ हजारांचे भाडे आकारले जाते. २ मार्चच्या सोहळ्याच्या तयारीसाठी २६ फेब्रुवारीपासूनच मैदान सज्ज होत होते. मैदानावर भव्य शामियाना उभा करण्यात आला. दुष्काळग्रस्त राज्याच्या राजधानीतील या प्रकाशन सोहळ्यासाठी पक्षाचे अनेक नेते आणि राज्याचे मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यामुळे मैदानात गालिचाही पसरण्यात आला. लाल पायघडय़ांनी मैदान सजून गेले. प्रवेशद्वारावर भव्य होर्डिग्ज उभी राहिली आणि कार्यक्रमाच्या जाहिरातींच्या विशाल फलकांनी अवघा परिसर भरून गेला. एवढा अवाढव्य पसारा आवरण्यासाठीदेखील आणखी दोन दिवस लागतील, असा अंदाज नागरिक व्यक्त करतात. त्यासाठीचे भाडे साहजिकच भरावे लागणार असल्याने, आवराआवरीसाठीच किमान ५० हजारांचा खर्च होईल; म्हणजे, केवळ भाडय़ाची रक्कमच पावणेदोन लाख असेल, असे बोलले जाते.
या मैदानाच्या आसपास प्रसूतिगृह, रुग्णालय आणि शाळा असल्याने हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र, या सोहळ्यामुळे हा परिसर आवाजाने गजबजून गेला आहे. याबद्दल नाराजी नोंदविली, तरी सोहळा पार पडणारच याबद्दल नागरिकांच्या मनात शंका नव्हती; तरीही शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख अरविंद भोसले यांनी पोलीस ठाण्यापासून पालिकेपर्यंत विविध यंत्रणांकडे तक्रार नोंदविली. कार्यक्रमस्थळी येऊन आवाजाची मोजदाद करण्याची विनंतीही राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाला करण्यात आली. परंतु जांबोरी मैदानात पाहणीसाठी येण्यासदेखील अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली, असे भोसले म्हणाले.