सयआत्मकथनाचे अभिवाचन

ज्येष्ठ निर्मात्या-दिग्दर्शिका सई परांजपे यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या तीनही माध्यमात आपल्या सर्जनशील प्रतिभेचा कलात्मक अविष्कार उमटविला. त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासातील या आठवणींचा पट आता लवकरच आकाशवाणीवरुन उलगडला जाणार आहे. सई परांजपे यांनी लिहिलेल्या ‘सय-माझा कलाप्रवास’या आत्मकथनाचे अभिवाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. विशेष म्हणजे हे अभिवाचन त्यांनी स्वत:च केले आहे.

सई परांजपे यांनी आपला प्रदीर्घ कलाप्रवास ‘सय-माझा कलाप्रवास’ या आत्मकथनात्मक पुस्तकात उलगडला आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘सय’ या सदरात त्यांचे हे लेखन प्रसिद्ध झाले होते. पुढे ‘राजहंस’ प्रकाशनाने त्याचे पुस्तकही प्रकाशित केले. निर्माती, दिग्दर्शिका, पटकथाकार, नाटककार अशी ओळख असलेल्या सई परांजपे यांच्या अनेककलाकृतींनी रसिकांना आजवर भरभरुन आनंद दिला आहे. आता ‘सय’ अभिवाचनाच्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.

अभिवाचनाचा प्रत्येक भाग सुमारे दहा ते पंधरा मिनिटांचा असून असे ४० भाग असतील. सई परांजपे यांनी त्यांच्या कलाप्रवासातील ज्या सहकाऱ्यांचा उल्लेख अभिवाचनात केला आहे त्यापैकी काही मान्यवरांची दूरध्वनीवरील प्रतिक्रिया कार्यक्रमात सादर करण्याचा आमचा मानस असल्याचे कार्यक्रमाच्या निर्मात्या उमा दीक्षित यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

पुस्तक अभिवाचन उपक्रमाला आकाशवाणीच्या श्रोत्यांकडून नेहमीच खूप चांगला प्रतिसाद मिळतो. ‘सय’च्या निमित्ताने आता पुन्हा एक चांगले पुस्तक रसिकांच्या भेटीला येणार आहे. हे अभिवाचन स्वत: सई परांजपे यांनी केल्यामुळे श्रोते आणि आकाशवाणीसाठीही तो ‘दुग्धशर्करा’ योग ठरला आहे.

अभिवाचनाचे ध्वनिमुद्रण नुकतेच पूर्ण झाले असून ‘अस्मिता’ वाहिनीसह राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रावरुन या कार्यक्रमाचे प्रसारण व्हावे, असा आकाशवाणीचा प्रयत्न असल्याचेही त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सय’ हा माझ्या कलाप्रवासातील मैलाचा दगड असून आधी ‘लोकसत्ता-लोकरंग’ पुरवणीत सदर स्वरुपात आणि नंतर पुस्तक स्वरुपातही ‘सय’ला वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. माझ्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरुनच झाली. आता पुन्हा अभिवाचनाच्या निमित्ताने ‘सय’ आकाशवाणीच्या श्रोत्यांपुढे सादर होणार आहे. माझ्याकडे स्वत:ची अशी निवेदन व नाटय़पूर्ण अभिवाचन करण्याची शैली आहे. अभिवाचन करणे मला आवडतेही. आकाशवाणीमुळेच माझ्यातील ही कला अधिक जोपासली आणि बहरली गेली. ‘सय’च्या अभिवाचनासाठी मी जेव्हा आकाशवाणीवर गेले तेव्हा मला माहेरी आल्यासारखा आनंद झाला. आता अभिवाचनाच्या निमित्ताने माझ्यातील ही कला श्रोत्यांसमोर सादर करणार आहे. ‘सय’ला वाचकांनी प्रतिसाद दिला तसा आता आकाशवाणीच्या श्रोत्यांकडूनही मिळेल, अशी अपेक्षा.    सई परांजपे