Saif Ali Khan Stabbed Case: बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खानच्या घरात गुरुवारी (दि. १६ जानेवारी) मध्यरात्री घुसखोरी करत त्याच्यावर हल्ला करण्याची घटना घडली. या प्रकरणामुळे बॉलिवूड आणि देशभरात खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली. मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला होता. आता या प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. पोलिसांनी आज सकाळी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात आणले गेले आहे. इथे त्याची चौकशी सुरु असून याबद्दल अधिकची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.

सैफ अली खानच्या इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोर आरोपीचा चेहरा दिसला होता. त्याच्याशी साध्यर्म असणाऱ्या व्यक्तीला अटक केली असून तोच आरोपी आहे का? याची चौकशी सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी याआधी सांगितले होते की, सैफच्या पाठीतून काढलेल्या ब्लेडचा एक भाग ताब्यात घेतला आहे. तर उर्वरित भाग परत मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला शेवटचे वांद्रे स्थानकात पाहिले गेले होते. या घटनेनंतर आरोपी वांद्रे स्थानकात गेला आणि तिथून सकाळच्या पहिल्या ट्रेनने तो वसई-विरारच्या दिशेने गेला, असा पोलिसांचा अंदाज असून त्यादृष्टीने पोलिसांनी शोध सुरू केला. वसई, नालासोपारा आणि विरार भागात मुंबई पोलिसांची पथके रवाना झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी घरात कसा शिरला? सैफवर हल्ला करण्यामागचा नेमका उद्देश काय? याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. दरम्यान, सैफच्या घरात किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हल्लेखोराचा घरात जाताना किंवा तिथून पळून जातानाचा कोणताही व्हिडीओ समोर आलेला नाही. मात्र इमारतीच्या पायऱ्यांजवळील एका कॅमेऱ्यात हल्लेखोर कैद झाला आहे. या व्हिडीओच्या मदतीने पोलीस आता हल्लेखोराचा तपास केला.