Saif Ali Khan Hotel Brawl Case Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा १३ वर्षे जुन्या खटल्यात बुधवारी तिच्या वकिलांबरोबर मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयात हजर झाली. या प्रकरणाशी संबंधित याआधीच्या सुनावणीवेळी ती न्यायालयात हजर झाली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने तिच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. वॉरंट जारी झाल्यानंतर मलायका न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाली.
मलायका सदर प्रकरणात फिर्यादी (सैफ अली खान) पक्षाची साक्षीदार होती. मात्र फिर्यादी पक्षाने न्यायदंडाधिकाऱ्यांना सांगितलं की मलायका त्यांचं समर्थन करत नाही. त्यामुळे मलायकाचं या प्रकरणातून नाव हटवण्यात आलं आहे. कोर्टाने एप्रिल २०२४ मध्ये मलायकाविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
ही २०१२ मधील घटना आहे. मलायका अरोरा, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, त्याची पत्नी व अभिनेत्री करीना कपूर, मलायकाची बहीण अमृता अरोरा, तिचा पती आणि त्यांचे इतर मित्र मिळून दक्षिण मुंबईमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. मात्र, हॉटेलमध्ये एका इसमाने कुठल्या तरी कारणावरून या स्टार मंडळींशी वाद घातला.
हा इसम मूळचा दक्षिण आफ्रिकन नागरिक होता. तो एक अनिवासी भारतीय इक्बाल मीर शर्मा याच्याबरोबर तिथे आला होता. मात्र, या वादानंतर शर्माने कुलाबा पोलीस ठाण्यात सैफ अली खान, अमृता अरोराचा पती शकील लडाख व त्याचा मित्र बिलाल अमरोही या तिघांविरोधात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारावर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदाराने आरोप केला होता की सैफ अली खानने त्याच्या चेहऱ्यावर ठोसा लगावला. त्यात त्याच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं. गेल्या वर्षी याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी अमृता अरोरासह इतर तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्यानंतर मलायका अरोरा हिला साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. न्यायालयाने तिच्या नावे समन जारी केल्यानंतरही ती न्यायालयासमोर हजर झाली नाही. त्यामुळे न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिच्याविरोधात वॉरंट जारी केलं होतं. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मलायकाच्या बहिणीने न्यायदंडाधिकाऱ्यांना काय सांगितलं?
अमृता अरोराने न्यायदंडाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही सर्वजण जेवत असताना तो इसम तिथे आला आणि आमच्यावर ओरडला. आम्ही मोठ्याने बोलत आहोत असं त्याचं म्हणणं होतं. त्यावर सैफने त्याची माफी मागितली. थोड्या वेळाने रेस्टरूममधून भांडणाचा आवाज आला. सैफ व त्या इसमाचं तिथे भांडण चालू होतं. तो इसम सैफला मारत असताना आम्ही ते भांडण सोडवलं.