नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून वास्तववादी व काल्पनिक अशा वैविध्यपूर्ण भूमिका साकारून मनोरंजनसृष्टीवर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे ‘सकाळ तर होऊ द्या’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयाची शतकपूर्ती करीत आहेत. यानिमित्ताने शंभर विविधांगी भूमिकांची श्रीमंती वाट्याला आली, अशी भावना सुबोध भावे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. ‘रवींद्र महाजनी दिग्दर्शित ‘सत्तेसाठी काहीही’ हा माझा पहिला चित्रपट ते आता प्रदर्शित होऊ घातलेला आलोक जैन दिग्दर्शित ‘सकाळ तर होऊ द्या’ हा शंभरावा चित्रपट, एकूणच हा प्रवास फार विलक्षण आहे. मराठी, हिंदी, बंगाली, मल्याळम भाषेतील चित्रपटांमधून जवळपास शंभर विविध व्यक्तिरेखा मला जगता आल्या, अनेक लेखक, दिग्दर्शक, निर्माते व कलावंतांसोबत काम करता आल्यामुळे मी खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो’ अशी भावना सुबोध भावे यांनी व्यक्त केली.

मराठी मनोरंजनसृष्टीत सुबोध भावे यांनी अभिनयासह दिग्दर्शक म्हणूनही स्वतःची विशेष ओळख निर्माण केली. एकाच वेळी अभिनेता – दिग्दर्शक अशी दुहेरी जबाबदारीही सांभाळली. मात्र, हे आवडीचेच काम असल्यामुळे एकाचवेळी या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्याचा अनुभवही सुखदच होता, असं त्यांनी सांगितलं. ‘माझ्यासाठी अभिनय करणे म्हणजे श्वास घेण्याइतकी सहज गोष्ट आहे’, असं सांगताना नव्याने दिग्दर्शन कधी करायचं हे अजून ठरवलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या विविध कथांवरती काम सुरू आहे.

जेव्हा संहिता परिपूर्ण पद्धतीने समोर असेल आणि माझी पूर्ण तयारी असेल, तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शन करेन, असंही त्यांनी सांगितलं. सध्या मराठी चित्रपटांची निर्मिती आणि अनेकदा एकाच दिवशी तीन ते चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन यामुळे गेल्या काही महिन्यात अनेक चित्रपटांना अपेक्षित आर्थिक यश साधता आलेले नाही. आत्ताही ‘दशावतार’, ‘कुर्ला टु वेंगुर्ला’ हे दोन चित्रपट चित्रपटगृहात तग धरून आहेत, मात्र त्यांना हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांकडूनही स्पर्धेला तोंड द्यावं लागतं आहे. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपटही प्रदर्शित होतो आहे, याबद्दल बोलताना ‘मराठी प्रेक्षकवर्ग कायमच चांगल्या चित्रपटांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे, त्यामुळे ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपटही प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन पाहतील’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लेखक हा सर्वश्रेष्ठच

आपण महर्षी व्यासांना नमस्कार करून गुरुपौर्णिमा साजरी करतो. व्यास नसते तर महाभारत घडले नसते आणि वाल्मिकी ऋषी नसते, तर रामायण घडले नसते. लेखकांचे महत्त्व हे भारतीय परंपरेत दिसून येते. ज्याच्या कल्पनेतून सर्व उभे राहते, कथेचा विस्तार होतो, व्यक्तिरेखा साकारल्या जातात, एखादी गोष्ट काही हृदयांमधून लाखो हृदयांपर्यंत पोहोचते. त्यामुळे लेखक हा सर्वश्रेष्ठच आहे, अशी प्रांजळ कबुली सुबोध भावे यांनी दिली.

मानसी नाईकबरोबर १७ वर्षांपासूनची मैत्री

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मानसी नाईक यांनी एकत्र काम केले आहे. ‘माझी आणि मानसीची गेल्या १७ वर्षांपासून चांगली मैत्री आहे. तिने अभिनेत्री म्हणून काम करावे, हे मनापासून वाटायचे आणि यासंदर्भात तिच्याशी कित्येकदा बोलणंही झालं आहे. एक उत्तम नृत्यांगना म्हणून मानसीवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटानंतर प्रेक्षक मानसीकडे अभिनेत्री म्हणूनही गांभीर्याने पाहतील’ असा विश्वास सुबोध यांनी व्यक्त केला.