मुंबई : ठाण्यातील खड्डयांचा आणि त्याअनुषंगाने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. असे असताना ठाण्यातील महत्त्वाचा असा साकेत पूल आणि कशेळी पुल खड्डेमुक्त केल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी)केला आहे. सर्वाधिक खड्डे असलेले असे हे दोन रस्ते होते.मात्र आता येथील खड्डे बुजविण्यात आले असून  वाहतूक कोंडी दूर झाल्याचा दावाही एमएसआरडीसीकडून करण्यात आला आहे.

सध्या मुंबई आणि ठाण्यातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य आहे. खड्डयांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि एमएसआरडीसीला स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या दोन्ही यंत्रणा खड्डे बुजविण्याच्या कामाला लागल्या आहेत. मागील दोन दिवसांत येथील सर्व खड्डे बुजविण्यात आल्याने  येथील वाहतूक आता सुरळीत झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ठाण्यात सर्वाधिक खड्डे असून ते भरण्याचे मोठे आव्हान या दोन्ही यंत्रणांसमोर आहे. त्यातही साकेत पूल आणि कशेळी पुल हे सर्वाधिक खड्डे असलेले पूल म्हणून ओळखले जातात. मुंबई-नाशिक द्रुतगती मार्गावरील साकेत पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. भिवंडी, कल्याण, जेएनपीए नाशिक आणि गुजरातला येण्यासाठी-जाण्यासाठी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.