Abu Azmi comment on 2006 Mumbai train blasts case: मुंबईत २००६ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष ठरवण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली. यानंतर आता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आझमी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कर नाही त्याला डर कशाला’, असे सांगत सर्वोच्च न्यायालयातही १२ जणांचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असे ते म्हणाले आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेशी या विषयावर बोलत असताना अबू आझमी म्हणाले, “१९ वर्षांपासून हे लोक तुरुंगात होते. सत्र न्यायालयाने पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर एकाला सोडून दिले होते. तेव्हापासून उच्च न्यायालयात सदर प्रकरणाची सुनावणी सुरू होती. मुंबई उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द केला. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.”

“या लोकांना जाणूनबुजून अडकविण्यात आले होते. पुरावे मिळालेले नाहीत. कुर्ल्याच्या घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे. कुर्ल्यातील अत्ताउर रहमानच्या मुलाला मीरा रोड येथे पकडले. त्यानंतर त्याला कुर्ल्यातील पोलीस ठाण्यात आणले. तिथे अत्ताउर रहमान आणि त्यांच्या सुनेलाही बोलवले गेले. पोलिसांनी सुनेचा बुरका काढून पायाखाली तुडवला. तसेच अत्ताउर रहमानचे सर्व कपडे काढून त्याला मारहाण करण्यात आली”, असा धक्कादायक दावा अबू आझमी यांनी केला.

पोलीस अत्ताउर रहमानला मारहाण करत असताना त्यांच्या मुलाने गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव टाकला जात होता. यावर अत्ताउच्या मुलाने पोलिसांना सांगितला की, तुम्हाला जे लिहायचे ते लिहा. पण माझ्या वडिलांना आणि वहिनीला सोडून द्या. अशाप्रकारे जर कबुली जबाब घेतले असतील तर लोकशाहीत हा मोठा गुन्हा आहे, अशी टीका अबू आझमी यांनी केली.

अबू आजमी पुढे म्हणाले, बळजबरीने जर कबुली जबाब घेतले असतील तर अजूनही न्याय बाकी आहे, असे मी म्हणेण. उच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिल्याचा मला आनंद होत आहे. आता सरकार जरी सर्वोच्च न्यायालयात गेले असले तरी काही होणार नाही. कारण ज्यांनी गुन्हाच केला नाही त्यांना कशाची भीती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आपला नाकर्तेपण लपविण्यासाठी निर्दोष लोकांकडून कबुली जबाब लिहून घेतला. ज्यांनी बॉम्बस्फोट केला, त्या लोकांना पकडायचे सोडून जे निरपराध आहेत, त्यांना पकडले गेले. याचा अर्थ गुन्हे करणारे नामानिराळे राहिले आहेत, असेही आमदार अबू आजमी यांनी यांगितले.