scorecardresearch

उमरखाडीतील देवीच्या चंदनमूर्तीला नवा साज

काही मंडळांनी चंदनाच्या लाकडापासून बनविलेल्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

उमरखाडीतील देवीच्या चंदनमूर्तीला नवा साज
नायगाव बीडीडी चाळीतील चंदनाची देवी सार्वजनिक मंडळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मंडळाची चंदनाच्या लाकडाची मूर्ती ७३ वर्षे जुनी आहे.

नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील काही मंडळांनी चंदनाच्या लाकडापासून बनविलेल्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या मूर्ती विसर्जित न करता पुन्हा त्यांची पूजा बांधली जाते. सध्या या मूर्तीवर रंगरंगोटीचे काम सुरू आहे.

डोंगरी येथील उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव-नवरात्रोत्सव मंडळ आणि नायगाव बीडीडी चाळ येथील ‘चंदनाच्या देवी’ अशाच वैशिष्टय़पूर्ण आहेत.

उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव-नवरात्रोत्सव मंडळाची ४६ वर्षे जुनी अशी चंदनाच्या एका खोडापासून बनविण्यात आलेली अष्टभुजा सिंहारूढ देवीची मूर्ती आहे. वसईच्या सिक्वेरा बंधूंनी १९७० साली ही मूर्ती घडवून मंडळाला दिली. या मूर्तीचे डोळे ऑस्ट्रेलिया येथून बनवून घेण्यात आले आहेत. सुरुवातीच्या काळात मंडळ एकाच वर्गणीतून दोन उत्सव साजरे करीत असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष गजानन पाटील यांनी दिली.

डोंगरीबरोबरीनेच दादरमधील नायगाव बीडीडी चाळीतील चंदनाची देवी सार्वजनिक मंडळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मंडळाची चंदनाच्या लाकडाची मूर्ती ७३ वर्षे जुनी आहे. १९४४ साली मालवण येथील मूर्तिकार सावर्डेकर यांनी ही लाकडी मूर्ती बनवून मंडळाला दिली. साडेचार फुटी अष्टभुजा स्वरूपातील उभे असे या मूर्तीचे स्वरूप आहे. त्या काळी मूर्ती घडविण्यासाठी ८०० रुपये खर्च आल्याचे मंडळाचे प्रशांत घाडिगांवकर यांनी सांगितले. सध्या वाढत चाललेल्या प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन ही लाकडाची मूर्ती तयार करून घेतल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2017 at 03:20 IST

संबंधित बातम्या