मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार संजय दत्त याचा जीव पहिल्याच दिवसापासून कारागृहात गुदमरू लागला आहे. आपण काही दहशतवादी नाही, असा दावा करीत आपल्याला अतिसुरक्षित आणि बंदिस्त ‘अंडासेल’मधून इतरत्र हलवा, अशी मागणीही त्याने वकिलाकरवी शुक्रवारी विशेष ‘टाडा’ न्यायालयाकडे केली.
आजारांची सबब पुढे करीत झोपायला गादी-उशी, खेळत्या हवेसाठी पंखा, घरचे जेवण, जेवणानंतर शतपावली अशी सुविधांची खैरात न्यायालयाकडून झोळीत पाडून घेत संजय गुरुवारी रात्री आर्थर रोड कारागृहात दाखल झाला. मात्र त्याच्या जिवाला धोका असल्याच्या कथित धमकीच्या पाश्र्वभूमीवर कारागृह प्रशासनाने सुरक्षेचा भाग म्हणून त्याला अतिसुरक्षित आणि बंदिस्त अशा ‘अंडासेल’मध्ये ठेवले. त्यामुळे संजयने शुक्रवारी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. बंदिस्त अशा ‘अंडासेल’मध्ये खेळत्या हवेच्या अभावामुळे संजयचा जीव गुदमरून त्याला अस्वस्थ वाटू लागते. शिवाय अन्य कैद्यांपासून सुरक्षा म्हणून सराईत गुन्हेगार वा दहशतवाद्यांना ‘अंडासेल’मध्ये ठेवले जाते. परंतु संजय हा दहशतवादी वा सराईत गुन्हेगार नाही. त्यामुळे त्याला ‘अंडासेल’मध्ये ठेवण्याची गरज नसून त्याला तेथून हलविण्याचे आदेश देण्याची विनंती संजयचे वकील रिझवान र्मचट यांच्याकरवी ‘टाडा’ न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने र्मचट यांना या विनंतीसाठी अर्ज करण्याची सूचना केली.

आर्थर रोडमध्येच मुक्काम?
न्यायालयासमोर शरणागती पत्करल्यानंतर संजयला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. परंतु शिक्षा भोगण्यासाठी त्याला कुठे हलवायचे याबाबतचा निर्णय मात्र राज्य सरकारने अद्याप घेतलेला नाही. तळोजा, येरवडा, ठाणे, नागपूर आणि नाशिक कारागृहात सद्यस्थितीला किती कैदी आहेत, तेथील सुरक्षा व्यवस्थेची स्थिती काय आहे, कोणत्या टोळीचे किती गुंड कुठल्या कारागृहात दाखल आहेत आदींचा तपशील मागविण्यात आला आहे. त्यानंतरच संजयला आर्थर रोड कारागृहातच ठेवायचे की अन्यत्र हलवायचे याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. परंतु संजयला येरवडामध्येच हलविण्याची शक्यताही या अधिकाऱ्याने बोलून दाखवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन:शांतीसाठी धार्मिक पुस्तकांचा आधार!
साडेतीन वर्षांची उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा कारागृहात दाखल झालेला संजय रात्रभर अस्वस्थ होता. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी अखेर त्याने भगवद्गीता, रामायण आणि हनुमान चालिसा आदी पुस्तकांचा आधार घेतला. संजयने स्वत:सोबत काही धार्मिक आणि अध्यात्मिक पुस्तके कारागृहात नेली आहेत. ती नेण्याची परवानगी त्याने न्यायालयाकडे मागितली होती. त्यामुळे रात्रभर अस्वस्थ असलेल्या संजयने ती वाचून कारागृहातील पहिली रात्र घालवली. सकाळी मात्र त्याने काही वेळ व्यायाम केला, अशी माहिती कारागृह प्रशासनातील सूत्रांनी दिली.