Akashwani Canteen Waiter explains incident : मुंबईमधील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्यामुळे शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या मारहाणीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. अंगात बनियान (Vest) आणि कमरेला टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत आमदार संजय गायकवाड त्यांच्या खोलीतून कॅन्टीनमध्ये आले आणि त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला खडे बोल सुनावत मारहाण केली. दरम्यान, यावर कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की “रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा राडा झाला. आमदाराने आमच्या एका सहकाऱ्याला मारलं. जेवणात काहीतरी खराब आहे असं म्हणत त्यांनी मारहाण केली. सर्वजण शांतपणे जेवत होते. मात्र, अचानक आमदार आले आणि सर्वांना म्हणाले, कोणी काही खाऊ नका. कोणी काही खाल्लं असेल तर त्याचे पैसे देऊ नका. ते मारहाण करत होते. मी दिव्यांग असल्यामुळे माझ्या सहकाऱ्याला वाचवायला पुढे गेलो नाही. आमचा एक सहकारी मध्ये पडला आणि त्याने मार खाणाऱ्याला वाचवलं.”

दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की “मी काल ड्युटीवर नव्हतो. मात्र, आमच्या काही सहकाऱ्यांनी मला सांगितलं की “काल रात्री १० वाजता इथे मोठा राडा झाला. एका आमदाराने आमचा सहकारी योगेश शेट्टी याला मारहाण केली. त्याची प्रकृती सध्या बरी नाहीये. तो रुग्णालयात उपचार घेत आहे.”

आमदार गायकवाड काय म्हणाले?

दरम्यान, या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार गायकवाड यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. विधिमंडळात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, “जर कुणी मला विष देत असेल तर मी त्याची पूजा करायची का? बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हे शिकवलं नाही. आमच्यावर अन्याय झाल्यास त्याविरोधात पेटून उठण्याची शिकवण त्यांनी दिली होती.”

“मी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन चालकांना आतापर्यंत अनेक वेळा विनंती केली आहे की त्यांनी जेवणाचा दर्जा सुधारावा. तरी देखील काहीच सुधारणा झाली नाही. मी ३० वर्षांपासून आकाशवाणी कॅन्टीनमध्ये येत आहे. साडेपाच वर्षांपासून इथे राहतोय. या साडेपाच वर्षांत कित्येकदा जेवणाचा दर्जा सुधारण्यास सांगितलं. कॅन्टीनमधील अंडी १५ दिवसांपूर्वीची आहेत, मांस १५ ते २० दिवसांपासून शिळे आहे, भाज्याही शिळ्या असतात. इथे रोज ५ ते १० हजार लोक जेवतात. सगळ्यांच्या अशाच तक्रारी आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही आमदार गायकवाड यांना समज दिली आहे.”