मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी अटक केली. यानंतर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भांडूप पोलीस स्टेशनला येऊन प्रकरणाची माहिती घेतली. तसेच माध्यमांशी बोलताना पोलिसांच्या या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. यात त्यांनी ‘गद्दार ह्रदयसम्राट’ असा उल्लेख करत शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच दत्ता दळवी काय चुकीचं बोलले, असा प्रश्न विचारला.

संजय राऊत म्हणाले, “मी आत्ता भांडूप पोलीस स्टेशनला उभा आहे. मुंबईचे माजी महापौर, शिवसेनेचे उपनेते आणि आमचे सहकारी दत्ता दळवी यांना आज सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. एखाद्या ३०२, ३०७ कलम लागलेल्या खूनाच्या किंवा खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करायला गेल्यासारखी पोलिसांनी अटक केली. जणुकाही आरोपी कुठंतरी पळून जाणार आहे, अशाप्रकारे पोलिसांचा फौजफाटा दत्ता दळवींच्या घरात घुसला आणि त्यांना अटक करून भांडूप पोलीस स्टेशनला आणण्यात आलं.”

“दत्ता दळवींचा गुन्हा काय आहे?”

“दत्ता दळवींचा गुन्हा काय आहे? त्यांनी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकभावना भांडूपमधील एका मेळाव्यात व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्याबरोबरचे गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदू हृदयसम्राट म्हणवून घेत आहेत. त्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे”

संजय राऊत पुढे म्हणाले, “खरंम्हणजे गद्दार हृदयसम्राटांनी स्वतःला हिंदू हृदयसम्राट म्हणून घेणं वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. त्यासाठी खरं म्हणजे एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांवर बोलत नाही. मी एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करत आहे.”

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील विधानाबद्दल माजी महापौरांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यात ते काय चुकीचं बोलले आहेत?”

“एकनाथ शिंदे वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची हिंदू हृदयसम्राट ही पदवी स्वतःला लावून घेत आहेत. यावर दत्ता दळवींनी शिवसैनिक म्हणून त्या सभेत जोशपूर्ण भाषण केलं. ते असे म्हणाले की, आनंद दिघे असते, तर या गद्दार हृदयसम्राटांना चाबकाने फोडून काढलं असतं. त्यात ते काय चुकीचं बोलले आहेत?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.