संदीप आचार्य
मुंबई : भाजपा आता वैफल्यग्रस्त झाली असून त्यांना लोकांच्या जीवाचीही पर्वा राहिलेली नाही. करोनाचे गंभीर संकट असताना भाजपने मंदिरात घंटा बडवायचे राजकारण केले आता छटपूजेच्या नावाखाली पुन्हा एकदा लोकांच्या जीवाशी खेळ चालवल्याची घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे. यांची घंटा बडवू नौटंकी लोक पुरती ओळखून असल्याने हे पुन्हा एकदा तोंडावर आपटल्याशिवाय राहाणार नाहीत, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

युरोपातील अनेक देशात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर तेथील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली तसेच लॉकडाउन करण्यात आले. दिल्लीत करोनाची दुसरी लाट आल्यानंतर तेथेही लॉकडाउनची तयारी सुरु झाली आहे. हरियाणात करोनाची पुन्हा जोरात लागण सुरु झाल्याने तेथेही निर्बंधांचा विचार सुरु आहे. अशावेळी छटपूजेच्या नावाखाली भाजप जनतेच्या जीवाशी अमानुष व क्रूर भावनिक खेळ खेळू पाहात असल्याचे खासदास संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण देशात सर्वाधिक होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारमधील सर्व घटकांनी योजनाद्धपणे करोनाचा मुकाबला केला. यातूनच अनेक निर्बंध मागे घेतना काळजीपूर्वक पावले उचलण्यात आली.

हॉटेल- रेस्तराँ, जिमसह अनेक उद्योग सुरु करताना कोणती काळजी घ्यायची याची मार्गदर्शकतत्वे लागू करण्यात आली. अगदी मंदिरे उघडतानाही पुरेशी खबरदारी घेऊनच निर्णय घेण्यात आले. यामागे लोकांचे जीव याला सर्वोच्च प्राधान्य होते असे सांगून संजय राऊत म्हणाले, भाजपाने मंदिरांचे राजकारण केले. घंटा बडवत लोकांच्या जीवाशी खेळण्याचे काम केले व आताही छटपूजेच्या नावाखाली पुन्हा एकदा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा क्रूर खेळ चालविल्याचे संजय राऊत म्हणाले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी करोना विषयक व्यापक जनजागृती केली. ज्येष्ठ नागरिक, मधुमेही व उच्च रक्तदाबासह कोमॉर्बिड लोकांच्या जिल्हावार याद्या तयार केल्या. करोनाची दुसरी लाट आल्यास सर्वप्रथम या लोकांची काळजी घेण्याची योजना तयार केली. यातूनच राज्यातील करोना आटोक्यात येण्यास मोठी मदत झाल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी दोन लाखांपेक्षा जास्त रुग्णालयीन उपचारांखाली करोना रुग्णांची संख्या होती ती आज ८४ हजार एवढी कमी झाली आहे.

राज्यात आज केवळ २८४० नवीन करोना रुग्ण सापडले तर मुंबईत ५४१ करोना रुग्ण सापडले असून सरकारने योग्य काळजी व उपाययोजना केल्यानेच आज करोना आटोक्यात आला आहे. अशावेळी चौपाटीवर छटपूजेच्या निमित्ताने गर्दी होणे म्हणजे करोनाला आमंत्रण ठरेल. मात्र भाजपाला त्याची पर्वा नसल्याचे अनिल परब म्हणाले. मुंबई महापालिकेने चौपाट्यांवर अथवा नदीच्या ठिकाणी छटपूजा करण्यास बंदी लागू केली आहे. याबाबतची मार्गदर्शकतत्वे मंगळवारी पालिकेने जाहीर करताच भाजपाने आपली राजकीय पोळी भाजायला घेतली. भाजपाला आपल्या राजकारणापुढे लोकांच्या जीवाची काहीही किंमत नाही हेच त्यांनी छटपूजेचे ढोल बडवून दाखवून दिल्याचे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू म्हणाले.