मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावरुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात एक दिवसाचे आंदोलन नव्हते. हे भोंगे उतरविले जात नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. यावरुन आता शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. मुंबई पत्रकारांसोबत बोलताना भाजपाने व्यगंचित्र कलेचा गळा आवळला असल्याचे संजय राऊत म्हणाले.
“बाळासाहेबांच्या फटकाऱ्यांनी कोणालाही सोडले नाही. कुंचला आणि वाणी या दोन अमोघ शस्त्रांनी बाळासाहेबांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सत्ता परिवर्तन केले ही कुंचल्याची ताकद आहे. म्हणून आजही आम्ही व्यंगचित्राच्या कुंचल्यापुढे कायम नतमस्तक होतो. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार या देशात निर्माण व्हावा आणि देशात सुरु असलेल्या एकाधिकारशाही वर आसूड ओढावेत अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करतो. ज्यांच्याकडे ही क्षमता होती असे आम्हाला वाटायचे त्यांनी भोंग्याचे राजकारण सुरु केले,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
“आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता”; भोंगा प्रकरणावरुन राज ठाकरेंना शिवसैनिकांचा पाठिंबा
“कालपासून २४ तासांमध्ये लाखो हिंदूंनी आमच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. शिर्डी, त्र्यंबकेश्वर यासारख्या तिर्थस्थानी काकड आरती होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक भाविक नाराज झाले आहेत. तुम्ही मशिदीवरील भोंग्याचे राजकारण सुरु केले आणि ते हिंदूंच्या गळ्यापर्यंत आले आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.
भाजपाने व्यंगचित्र कलेचा गळा घोटला
“बाळासाहेब ठाकरेंनी आधी व्यंगचित्रांमधून फटकारे मारले आणि त्यांना कोणत्याही भाडोत्री भोंग्याची गरज लागली नाही. बाळासाहेबांची कला पुढे जाईल असे आम्हाला वाटले होते पण भाजपाने व्यंगचित्र कलेचा गळा घोटलेला आहे आणि महाराष्ट्रात आज वेगळंच चित्र दिसत आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मुंबईत वेळेचे बंधन न पाळता १३५ मशिदींवर अजान देण्यात आली त्या मशिदींच्या मुल्ला- मौलवींच्या विरोधात कारवाईची मागणी राज ठाकरेंनी केली आहे. मशिदींवरील भोंगे हटविले नाही तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचे पठण बुधवारी करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यानुसार पोलिसांनी राज्यभर खबरदारीचे उपाय योजले होते तसेच मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. आमचे आंदोलन एक दिवसाचे नाही. आंदोलन संपलेले नाही. जोपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले जात नाहीत तोपर्यंत मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आंदोलन सुरूच राहील, असे ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.