मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी २०२३ मध्ये दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी मुंबईतील माझगाव न्यायालयाने गुरुवारी भाजप नेते नितेश राणे यांना सुनावणीला उपस्थित राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्यास गुरूवारी नकार दिला. त्याचवेळी राणे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले.
खटल्याच्या सुनावणीला अनुपस्थित राहिल्याबद्दल गेल्या महिन्यात न्यायालयाने राणे यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर, २ जून रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राणे यांनी सुनावणीला उपस्थित राहण्यापासून कायमची सूट मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायदंडाधिकारी ए. कुलकर्णी यांनी गुरूवारी निर्णय देताना तो फेटाळला. तसेच, राणे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढून सुनावणी १८ जुलैपर्यंत तहकूब केली.
दोन वर्षांपूर्वी, राणे यांनी राऊतांना साप म्हणून संबोधले होते. तसेच, राऊत हे उद्धव ठाकरे यांना सोडून त्याच वर्षी जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील, असा आरोप केला होता. त्यानंतर,राऊत यांनी राणे यांच्याविरुद्ध मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती व बदनामीप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.