Video: "कशाला स्वत:ची अब्रू...", 'तो' व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला! | sanjay raut mocks cm eknath shinde on worli speech vacant chairs | Loksatta

Video: “कशाला स्वत:ची अब्रू…”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!

आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंनी वरळीच्या सभेतून प्रत्युत्तर दिलं. मात्र, या सभेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

sanjay raut eknath shinde (2)
संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात होते. या दोघांचा कोळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा आणि शिंदे गटाच्या नेतेमंडळींनी भाषणांमधून जोरदार टोलेबाजीही केली. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू होती. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपाची नेतेमंडळी शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं या कार्यक्रमाबद्दल बोललं गेलं. त्यानुसार भाषणांमधून अपेक्षेप्रमाणे टीका-टिप्पणीही झाली. मात्र, या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंचाही उल्लेख केला आहे.

एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर

वरळीतील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले होते. हिंमत असेल तर माझ्याविरोधात वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना “एकनाथ शिंदे छोटी आव्हान स्वीकारत नाही. मी मोठी-मोठी आव्हानं स्वीकारतो. मी असेच मोठे आव्हान सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं”, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.

‘वरळीतून लढून दाखवा,’ आदित्य ठाकरेंच्या खुल्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, जाहीर सभेत म्हणाले “अशी आव्हानं…”

दरम्यान, या भाषणावेळचा एक व्हिडीओ संजय राऊतांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सभेच्या ठिकाणी अनेक खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत. यावरून सध्या सत्ताधारी आणि ठाकरे गट यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. हा कार्यक्रम सभा नसून सत्काराचा होता, तिथे एवढी गर्दी अपेक्षित नव्हती, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र, त्याचवेळी विरोधकांकडून यावरून खोचक टीका केली जात आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊतांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर करत टोला लागावला आहे. “मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना लोक घरी निघालेत. वरळी कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला..कशाला उगाच स्वतःची अब्रू काढून घेताय..३२ वर्षांचा तरुण नेता भारी पडतोय..बरोबर ना?” असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 08:36 IST
Next Story
मी छोटी नव्हे, मोठी आव्हाने स्वीकारतो!, वरळीत मुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर