देशातील वेगवेगळ्या विषयांसंदर्भात चर्चा करण्यासाठी देशामधील वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या मुख्यमंत्र्यांची काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधीसोबत दुपारी चार वाजता बैठक होणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. पत्रकारांनी यावेळी राऊत यांना काल मुंबईमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलेली भेट आणि त्यानंतर शिवसेनेनं केलेल्या शुद्धीकरणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. याबद्दल राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी, “नाही माझ्या काही वाचनात आलं नाही,” असं उत्तर दिलं. पुढे पत्रकारांनी त्यांना घडलेल्या घटनांचा संदर्भ देत पुन्हा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, “आमचे शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार यावर बोलतील. हा स्थानिक प्रश्न आहे,” असं राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> “अडवण्याची भाषा करणारे गोमूत्रावर आले, म्हणून…”; नितेश राणेंचा शिवसेनेला टोला

पत्रकारांनी पुन्हा एकदा राऊत यांना नारायण राणेंनी मुख्यमंत्री महाराष्ट्र उद्धवस्त करतील अशी टीका केल्याचं सांगत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र राऊत यांनी या विषयावर आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. काल घडलेला प्रकार हा स्थानिक आहे त्यासंदर्भात आमचे स्थानिक नेते बोलतील असंही राऊत पुढे म्हणाले.

राणे काय म्हणाले होते?

राणे यांनी शिवाजी पार्क येथे चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे यांना स्मृतीस्थळी येण्यास बुधवारी विरोध केला होता, परंतु राणे यांनी स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले, तेव्हा  विरोध झाला नाही. त्यांच्या अभिनंदनाचे शिवाजी पार्क मधील  फलक पालिकेने सकाळी काढून टाकले. उद्धव ठाकरे आडमार्गाने येऊन सत्तेत बसले आहेत. आम्ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. आम्ही शपथ घेतली आहे, त्याचे पालन करू. आम्हाला नियम शिकविण्याची गरज नाही. यात्रेचा प्रतिसाद पाहता फारच कमी दिवस राहिले आहेत, वाट पाहा. जनता राज्य सरकारला कंटाळली आहे. पाऊस नसता, तर शक्तीप्रदर्शन केले असते, असे राणे यांनी स्पष्ट केले.

शुद्धिकरणाचं काय कारण देण्यात आलं?

शिवसेना सोडल्यानंतर व बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर नारायण राणे यांना कधी स्मृतीस्थळाची आठवण आली नव्हती. आता राजकारणासाठी  त्यांना बाळासाहेबांची आठवण झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत असतानाही बाळासाहेबांच्या या पुत्रावर चुकीच्या पद्धतीने टीका करणाऱ्या नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले. त्यामुळे दुग्धाभिषेक करून, फुले वाहून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण के ल्याचे अप्पा पाटील व इतर ज्येष्ठ शिवसैनिकांनी पत्रकारांना सांगितले.