तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सक्तवसुली संचालनालयासमोर(ईडी) आणखी एक खळबळजनक जबाब दिला. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह देशमुख यांची नावे घेतली आहेत. वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांचा दबाव असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“परमबीर सिंह हे आरोपी आहेत. त्यांच्या वर खंडणीपासून अपहरणापर्यंत असे अनेक गुन्हे आहेत. मनसूख हिरेन प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप लावले आहेत ते मला माहिती नाही. आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतील. या आरोपांचे विरोधीपक्षाने भांडवल केले तरी याचा काही उपयोग नाही. आम्ही सुद्धा पंतप्रधानांचे नाव घेतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचेही नाव घेतले जात होते. कोण कोणाचे नाव घेतो याच्यावरुन काही बोध होत नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

सिंह यांच्या जबाबानुसार, सचिन वाझेला पोलीस दलात घेण्यासाठी आणि त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद महत्त्वाचे गुन्हे तपासाला देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव टाकला होता. पोलीस खात्यात परतण्यासाठी अनिल देशमुख यांनी आपल्याकडे दोन कोटींची मागणी केल्याचे पुढे वाझे याने सांगितले होते, असा धक्कादायक आरोप सिंह यांनी आपल्या जबाबात केला आहे. वाझे हा त्याच्याकडील तपासाधीन गुन्ह्यांची माहिती त्याच्या वरिष्ठांना देत होता. पुढे वरिष्ठांकडून ती माहिती मला दिली जायची किंवा वाझे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत येऊन माहिती देत होते.

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य – संजय राऊत

नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळ्यानंतर संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्यापुढे सर्व समान आहेत. कायद्यासंदर्भात एखादी संस्था आली तर सहकार्य केले पाहिजे. जर कोणाला वाटत असेल कारवाई चुकीची आहे तर न्यायालयाचे दरवाजे मोकळे आहेत. त्यांची न्यायालयीन लढाई सुरु आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction after parambir singh allegations against cm abn
First published on: 03-02-2022 at 10:32 IST