शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर बंडखोर आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत दिरंगाई केल्याचा आरोप केला आहे. तसेच राहुल नार्वेकरांच्या घाना दौऱ्याबाबत मोठा दावा केला. ते शुक्रवारी (२९ सप्टेंबर) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते.

बंडखोर आमदार आणि त्यांच्यावरील अपात्रतेची सुनावणी यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात संविधानाविरोधात, कायद्याविरोधात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊन सरकार चालवलं जात आहे. दुसरीकडे हेच लोक आंतरराष्ट्रीय मंचावर लोकशाहीची प्रवचने झोडतील.”

“नार्वेकरांचं नाव आधी घानाला जाणाऱ्यांमध्ये नव्हतं”

“मला मिळालेल्या माहितीनुसार, घानात जे शिष्टमंडळ जाणार होतं त्यात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव नव्हतं. मात्र, अपात्रता सुनावणीला उशीर करण्यासाठी आणखी एक कारण हवं म्हणून त्या शिष्टमंडळात त्यांचं नाव टाकून देण्यात आलं. ही आपल्या लोकशाहीची अवस्था आहे आणि हे घानात लोकशाहीवर प्रवचन द्यायला जात आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

“मणिपूरची परिस्थिती भयंकर”

मणिपूरमधील हिंसाचारावर संजय राऊत म्हणाले, “मणिपूरची परिस्थिती भयंकर आहे. सरकार, गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय, पंतप्रधान या सर्वांचं हे अपयश आहे. विद्यार्थ्यांना गोळ्या झाडून जीवे मारण्यात आलं. सरकार काय करत आहे?”

हेही वाचा : “४ महिने उलट तपासणी, ४ महिने साक्ष अन् आठवड्यातून दोनदाच…”, परबांनी सांगितला नार्वेकरांचा ‘तो’ डावपेच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोदी सरकारने नवं संसद भवनात मणिपूरवर चर्चा करू दिली नाही”

“मोदी सरकारने नवं संसद भवन उभारलं, मात्र तेथे आम्हाला मणिपूरवर चर्चाही करू दिली नाही,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.