शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशभरात भाजपाविरोधकांवर होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राऊतांनी २०२४ मध्ये केंद्रात आणि महाराष्ट्रात आमचंच सरकार येणार असल्याचं म्हणत तपास यंत्रणांना जाहीर इशारा दिला. ते गुरुवारी (२४ ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीच्या तयारीला वेग आला आहे. ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. या देशातील भाजपाविरोधी नाही, तर देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत. देशात भाजपाविरोधी पक्षांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. काल आपण झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये अशा धाडी टाकण्यात आल्या. महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. यांना दुसरं काही दिसत नाही.”

“निवडणुकीआधीच विरोधकांना तुरुंगात टाकण्याचं काम सुरू”

“आपल्या विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, लोकशाही मार्गाने पराभव करता येणार नाही म्हणून निवडणुकीच्या आधीच विरोधकांना खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. हे सत्र दिल्लीसह राज्या राज्यात भाजपाचे लोक राबवत आहेत. याचा ‘इंडिया’ आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

व्हिडीओ पाहा :

“महाराष्ट्रातही पोलीस व तपास दलाकडून भाजपाच्या इशाऱ्यावर कारवाया”

संजय राऊत पुढे म्हणाले, “तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे कोणताही पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडेल असं कुणाला वाटत असेल, तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्रातही पोलीस व तपास दल भाजपाच्या इशाऱ्यावर कारवाया करत आहेत. त्यांनी आधी काळजीपूर्वक घटना व कायद्याचं वाचन करावं.”

हेही वाचा : Video: “कांदा परवडत नसेल तर खाऊ नका”, दादा भुसेंच्या विधानावर राऊत संतापले; म्हणाले, “दीडशहाणे मंत्री…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तपास यंत्रणांना राजकीय कारवायांची किंमत मोजावी लागेल”

“मी एक सांगू इच्छितो की, २०२४ मध्ये केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाचं सरकार राहणार नाही, आमचं सरकार येईल हे या यंत्रणांनी लक्षात ठेवावं. त्यांनी जे कायदेशीर आहे ते करावं. त्यांनी त्यांच्या राजकीय बॉसचे आदेश पाळले तर याद राखा. त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. हा इशारा नाही, तर सत्य आहे,” असा जाहीर इशारा राऊतांनी दिला.