लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: पित्त शमनासाठी वापरण्यात येणारे एका नामांकित कंपनीचे डायजिन जेल हे औषध मानांकनानुसार नसल्याने ते परत मागविण्याच्या सूचना केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (एसडीएससीओ) दिल्या आहेत. दरम्यान, डॉक्टर, वितरक, नियामक प्राधकरण आणि नागरिकांनी या औषधाचा वापर बंद करावा, असे आवाहन ‘एसडीएससीओ’ने केले आहे.
देशातील नामांकित कंपनीच्या डायजिन जेलचा रंग फिकट गुलाबी असून त्याची चव गोड आहे. मात्र एका ग्राहकाने विकत घेतलेल्या दोनपैकी एका बाटलीतील औषधाची चव नियमित औषधाप्रमाणे गोड होती आणि त्याचा रंग फिकट गुलाबी होता. मात्र दुसऱ्या बाटलीतील औषधाचा रंग पांढरा आणि चव कडू होती. तसेच त्याला तीव्र गंध येत होता. एकाच बॅचमधील दोन्ही बाटल्यांमधील औषध भिन्न असल्याने संबंधित ग्राहकांने याबाबत ९ ऑगस्ट रोजी ‘एसडीएससीओ’कडे तक्रार केली.
हेही वाचा… महागड्या चपलांची चोरी करणारी टोळी सक्रिय
या तक्रारीची दखल घेत ‘एसडीएससीओ’ने तपासणी केली असता कंपनीच्या बॅच क्रमांक ५१०३०३०७ मधील डायजिन जेल हे औषध मानांकनानुसार प्रमाणित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित कंपनीच्या गोवा येथील कारखान्यात उत्पादित केलेल्या डायजिन जेल मिंटची सर्व उत्पादन स्वेच्छेन थांबविण्याच्या सूचना ३१ ऑगस्ट रोजी कंपनीला देण्यात आल्या. त्यानुसार कंपनीनेही उत्पादन स्वेच्छेन थांबविण्याचा निर्णय घेतला. तसेच बाजारात वितरित केलेल्या या बॅचचे सर्व उत्पादन पुन्हा मागविण्यात येणार असल्याचे कंपनीकडून ‘सीडीसीएसओ’ला कळविण्यात आले आहे. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने बाजारात उपलब्ध औषधांबाबत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना औषध नियंत्रक संचालक डॉ. राजीव सिंह रघुवंशी यांनी केली आहे.
हेही वाचा… साकीनाका परिसरात अग्नितांडव; अग्निशमन जवानांनी वाचवले ३३ जणांचे प्राण
डॉक्टरांनी डायजिन जेल औषध लिहून देण्यापूर्वी काळजी घ्यावी. रुग्णांनी या औषधाचा वापर बंद करण्याच्या सूचना कराव्यात, असे निर्देश ‘सीडीसीएसओ’ने डॉक्टरांना केल्या आहेत. ग्राहकांनीही गोवा येथे उत्पादित झालेले हे औषध वापरणे बंद करावे. घाऊक विक्रेते आणि वितरकांनी ५१०३०३०७, ५००३५१०७, ५००३५२डी७, ५००३५३डी७, ५००३४०७ या बॅचमधील औषध वितरणातून काढून घ्यावे. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांतील औषध नियंत्रक आणि ‘सीडीएससीओ’चे सर्व विभागीय आणि उप-क्षेत्रीय कार्यालयांना या औषध उत्पादनांच्या हालचाली, विक्री, वितरण, बाजारातील साठा यावर बारीक लक्ष ठेवण्याची सूचना केल्या आहेत. हे उत्पादन बाजारात उपलब्ध असल्यास औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा आणि त्याखाली केलेल्या नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. राजीव सिंह रघुवंशी यांनी केल्या आहेत.
यापूर्वी डायजिन जेलप्रमाणेच अन्य कंपन्यांचे अशा प्रकारचे औषध मानांकनानुसार प्रमाणित नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे कंपन्यांनी पित्त शमनासाठी उत्पादित केलेल्या औषधांची केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने कसून तपासणी करावी. तसेच राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टरांना सतर्क करावे. – अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशन