मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण झालेले असून या लोकसभा निवडणूकीचा आधी प्रकल्पाचा एक भाग सुरू करण्याचा राज्य सरकारचा अट्टाहास आहे. त्यामुळे फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्पाची एक बाजू सुरू करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न असून त्याकरीता युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. जानेवारी अखेरीस मार्गाची एक बाजू खुली करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली असली तरी प्रत्यक्षात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच हा मार्ग खुला होऊ शकणार आहे. त्यातही शनिवारी आणि रविवारी हा मार्ग बंद राहणार आहे. एकूण साडे दहा किमीच्या मार्गापैकी केवळ ९ किमीचा मार्ग तो देखील दक्षिण मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरू होऊ शकणार आहे. संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यास मे २०२४ ची मुदत देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम सुरू असून प्रकल्पाचे केवळ ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या दोन महाबोगद्यांपैकी दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचा क्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जून महिन्यात साजरा करण्यात आला. तेव्हा या प्रकल्पाचा काही भाग तरी या वर्षाअखेरीस सुरू करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे या प्रकल्पाचा काही भाग नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पालिका प्रशासनाने ठेवले होते. या मार्गाची वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंतची बाजू सुरु करण्यात येणार होती. मात्र ती मुदत फेब्रुवारीवर गेली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह येथे स्वच्छता मोहीमेदरम्यान जानेवारी अखेर एक मार्गिका सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. परंतु, प्रत्यक्षात ही मार्गिका फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच सुरू होऊ शकणार आहे. मात्र नक्की कधी मार्गिका सुरू होईल याबद्दल निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
हेही वाचा >>>एअर इंडियाच्या रिकाम्या वीस इमारती पाडल्या; रहिवाशांचा विरोध असतानाही विमानतळ प्रशासनाकडून पाडकाम
जानेवारी अखेरपर्यंत दक्षिण दिशेच्या मार्गिकांची सर्व कामे पूर्ण करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही कामे पूर्ण होतील व त्यानंतर मार्गावरील दिशादर्शक चिन्हे, रंगकाम अशी बारिकसारीक कामे करून मग हा मार्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच या मार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नसल्यामुळे तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच समुद्राच्या जवळची उत्तर मुंबईत जाणारी बाजू अद्याप पूर्ण झालेली नाही. या मार्गाचे काम अद्याप सुरू असल्यामुळे दोन बाजूंमध्ये हिरवे पडदे लावण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी केवळ सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंतचा दक्षिण दिशेची बाजू सुरू राहणार आहे.
ऑक्टोबर २०१८ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. हा प्रकल्प प्रचंड मोठा व गुंतागुंतीचा आहे. न्यायालयीन स्थगितीमुळे व टाळेबंदीमुळे या प्रकल्पाची अंतिम मुदत वारंवार वाढवण्यात आली होती. नंतर वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून दिल्यामुळे कालावधी वाढला आहे.
वेगमर्यादा वाढणार, वेळ वाचणार
या मार्गावर ताशी १०० किमी वेगाने वाहने धावू शकतात. मात्र या मार्गावर ताशी ७० ते ८० किमी वेगमर्यादा असेल. संपूर्ण मुंबईतील इतर रस्त्यांची वेगमर्यादा ताशी २१ किमी असताना सागरी किनारा मार्गावरील वेगामुळे वेळेची ७० टक्के बचत होणार आहे. तर इंधनात ३४ टक्के बचत होईल असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
११ हजार कोटी अद्याप खर्च
या प्रकल्पाची मूळ किंमत १२,७२१ कोटी होती. मात्र जीएसटी १२ टक्क्यावरून १८ टक्के झाल्यामुळे व वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून देण्याच्या मागणीमुळे या प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. या प्रकल्पाचा खर्च १३,९८३ .८३ कोटींवर गेला आहे. यामध्ये बांधकाम खर्च आणि इतर प्रशासकीय शुल्क यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७९ टक्के म्हणजेच ११ हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत.