मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाअंतर्गत ३ आणि ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची दुसरी प्रवेश यादी शनिवार, ३१ मे रोजी सायंकाळी ७ वाजता संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून २ ते ४ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
प्रथम वर्ष पदवी प्रवेशाच्या पहिल्या प्रवेश यादीनुसार पारंपरिक अभ्यासक्रमांचे प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) दोन ते चार टक्क्यांनी घटले होते, तर स्वयंअर्थसाहाय्यीत अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांचा कल हा पारंपरिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त स्वयंअर्थसाहाय्यीत अभ्यासक्रमांकडे वाढत असल्यामुळे नामांकित महाविद्यालयात स्वयंअर्थसाहाय्यीत अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी चुरस वाढली आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत स्वयंअर्थसाहाय्यीत अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये घट होणार का ? की पुन्हा वाढ होणार ? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया समांतरपणे सुरूच ठेवा – युवा सेनेची मागणी
मुंबई विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अंतर्गत प्रथम वर्ष विविध पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८ मे ते २६ मे या कालावधीत प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली, विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. वेळापत्रकानुसार प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया बंद झाली असून प्रवेश यादी जाहीर होऊन प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रक्रियेसंदर्भात अनेक विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश यादीत नाव येऊनही विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी न केल्यामुळे संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत समांतरपणे प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियाही सुरू ठेवावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांना प्रवेश घेताना तांत्रिक अडचण येणार नाही, अशी मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे.