दादरमधील इमारतीच्या अग्निसुरक्षेच्या मुद्दय़ावरून प्रकल्प रखडणार?

मुंबई : वडाळा ते संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) हा मोनो मार्गिकेचा दुसरा टप्पा कार्यान्वित होण्यास पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावरील दादर पूर्व स्थानकाच्या बांधकामामुळे कडेलाच असणाऱ्या रहिवासी इमारतीचा रस्ता अरुंद झाल्याकडे लक्ष वेधत येथील मार्गरोधकांमध्ये (बॅरिकेड) फेरबदल करण्याच्या सूचना अग्निशमन दलाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिल्या आहेत.

नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर स्थानकात मोनोला लागलेल्या आगीनंतर पहिल्या टप्प्याच्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्यानंतर चेंबूर ते सातरस्ता या संपूर्ण मार्गिकेसाठी आवश्यक असणारी सुरक्षा परवानगी रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी एप्रिल महिन्यात एमएमआरडीएला दिली होती. तसेच अंतिम परवानगीकरिता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र त्यामध्येही राज्य सरकारने खोडा घातला असून काही सुरक्षात्मक बाबींचा खुलासा करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने प्राधिकरणाला केल्या आहेत. भविष्यात या मार्गिकेला राज्य सरकारने परवानगी दिली तरी प्राधिकरण दादर पूर्व स्थानकाला दळणवळणासाठी कार्यान्वित करू शकत नाही. कारण मोनोच्या इतर सोळा स्थानकांप्रमाणे या स्थानकाला अजूनही अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालेले नाही.

या स्थानकाला लागूनच असलेल्या भव्य नामक इमारतीच्या रहिवाशांनी २०१५ साली स्थानकामुळे निर्माण झालेल्या अग्निसुरक्षेच्या मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. स्थानक आणि इमारतीमध्ये केवळ दोन मीटरचे अंतर असल्याने आग लागल्यास अग्निशमन दलाच्या गाडीला येण्यास अटकाव होईल, असे रहिवाशांचे म्हणणे होते. त्यानंतर आता या स्थानकाखालील रस्त्याची दुरुस्ती आणि पदपथावरील मार्गरोधकांमध्ये फेरफार करण्याच्या सूचना अग्निशमन दलाने प्राधिकरणाला दिल्या आहेत. मॉक ड्रिल करण्याच्या दृष्टीने स्थानकाखालील रस्ता अजूनही समांतर नाही. शिवाय पदपथावरील काही मार्गरोधकांमुळे इमारतीनजीक फायर इंजिन नेणे शक्य नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी हेमंत परब यांनी दिली. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती आणि मार्गरोधकांमध्ये फेरफार करण्याच्या सूचना एमएमआरडीएला दिल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन दलाकडून सूचना मिळाल्या असून मॉक ड्रिल करण्याच्या दृष्टीने संबंधित दुरुस्ती करणार असल्याची माहिती एमएमआरडीएमधील एका अधिकाऱ्याने दिली.