मुंबई : पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली फेरी संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे दुसऱ्या फेरीच्या वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे. मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाअंतर्गत असलेल्या वैद्यकीय समुपदेशन समितीकडून (एमसीसी) दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात दिरंगाई होत असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाची दुसरी फेरी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एमसीसीकडून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सीईटी कक्षाने २३ जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करून ७ ऑगस्टला पहिल्या यादीतील प्रवेश प्रक्रिया १२ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले. त्याला मुदतवाढ देत ही प्रवेश प्रक्रिया २२ ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली.

पहिल्या फेरीची निवड यादी ११ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या ८ हजार १३८ जागांपैकी ८ हजार १०६ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशांची संधी उपलब्ध करण्यात आली होती. यापैकी ६ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी २२ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला आहे. यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये ४ हजार ४१७, तर खासगी महाविद्यालयांमध्ये २ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी १ हजार २९० जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये ५०३, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ७८८ जागांचा समावेश आहे.

दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी असणाऱ्या विद्यार्थांचे या फेरीच्या वेळापत्रकाकडे लक्ष लागले आहे. मात्र पहिली फेरी संपून आठवडा उलटला तरी एमसीसीकडून दुसऱ्या फेरीसंदर्भात कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. एमसीसीकडून वेळापत्रक जाहीर करण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे दुसरी फेरी लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. दुसरी फेरी जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशावरही परिणाम

वैद्यकीय अभ्यासक्रमाप्रमाणे पदवी दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमध्ये २ हजार ७२५ जागांपैकी २ हजार ७०९ विद्यार्थ्यांनी २२ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेतले. यापैकी सरकारी महाविद्यालयांमध्ये ३११, तर खासगी महाविद्यालयांमध्ये २ हजार ३९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे दंत अभ्यासक्रमाच्या सरकारी महाविद्यालयामध्ये १५४ आणि खासगी महाविद्यालयांमध्ये १ हजार ६१० अशा १ हजार ७६४ जागा रिक्त राहिल्या आहेत. मात्र एमसीसीकडून दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यास दिरंगाई करण्यात येत असल्याने पदवी दंत अभ्यासक्रमाची दुसच्या फेरीला विलंब होण्याची शक्यता आहे.