पालघरमध्ये आज पोटनिवडणूक; प्रस्थापितविरोधी लाटेवर काँग्रेसची भिस्त
सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असला तरी नियोजित वाढवण बंदर आणि पालघरमधील प्रस्तावित सागरी सुरक्षा केंद्र गुजरातमध्ये स्थापन करणे हे केंद्रातील भाजप सरकारचे दोन निर्णय उद्या होणाऱ्या पालघर (राखीव) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेसाठी त्रासदायक ठरले आहेत.
शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत घोडा यांचे पुत्र अमित घोडा (शिवसेना), माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित (काँग्रेस) आणि मनीषा निमकर (बहुजन विकास आघाडी) यांच्यात तिरंगी लढत होत आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले कृष्णा घोडा अवघ्या ५१५ मतांनी विजयी झाले होते. गेल्या वेळी निसटता पराभव झाल्याने या वेळी विजय मिळवायचाच या निर्धाराने काँग्रेसचे राजेंद्र गावित रिंगणात उतरले आहेत.
काँग्रेसने वाढवण बंदर आणि पालघरमधील सागरी सुरक्षा केंद्र गुजरातमधील द्वारकामध्ये हलविण्यात आल्याचा मुद्दा प्रचारात प्रकर्षांने मांडला. डहाणूजवळील नियोजित वाढवण बंदरामुळे मच्छीमारीवर परिणाम होईल हा प्रचार मोठय़ा प्रमाणावर मच्छीमार मतदार असल्याने महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. वाढवण बंदराला शिवसेनेने आधी विरोध केला होता, पण प्रचाराच्या वेळी शिवसेनेने काहीशी गुळमुळीत भूमिका घेतल्याने काँग्रेसने नेमके त्यावर बोट ठेवले आहे. पालघरमधील प्रस्तावित सागरी सुरक्षा केंद्राला ३०० एकर जागा राखीव ठेवूनही केंद्रातील भाजप सरकारने हा प्रकल्प द्वारकेला हलविणे, पालघर जिल्हानिर्मिती यावर प्रचारात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भर दिला. मतमोजणी १६ तारखेला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपच्या मतांचे गणित
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने सारी शक्ती पणाला लावली आहे. गेल्या वेळी भाजपच्या उमेदवाराला ३४ हजार मते मिळाली होती. ही मते कोणाकडे जातात यावरही बरेचसे गणित अवलंबून आहे. भाजपला मिळालेली मते शिवसेनेलाच मिळतील, असा दावा शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी केला आहे. तर भाजपच्या मतांवर ठाकूर यांचा डोळा आहे. सध्या ठाकूर आणि भाजपमध्ये जवळीक आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये आदिवासींची मते भाजपकडून काँग्रेसच्या परडय़ात पडली होती. पालघरमध्ये हा कल कायम राहील, असा काँग्रेसला विश्वास आहे. मुख्य लढत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security center wadhwan port shiv sena
First published on: 13-02-2016 at 00:44 IST