अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) नवी मुंबई येथून एका पेढीतून २९ कोटी रुपयांचा आयात करण्यात आलेला विविध अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे. राज्याच्या विविध भागातून आलेला हा साठा उंदीर आणि झुरळांचा सुळसुळाट असलेल्या अत्यंत अस्वच्छ ठिकाणी साठवून ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पेढीधारकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अन्न पदार्थांचे ३५ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>अंधेरी गोखले पूल बंद झाल्यास नागरिकांना मेट्रोचा पर्याय ; प्रवासी संख्या किमान २० हजाराने वाढण्याचा अंदाज

एफडीएने अन्न पदार्थांच्या तपासणी मोहिमेअंतर्गत २ नोव्हेंबरला नवी मुंबईतील टीसीसी इंडस्ट्रीयल एरिया येथील एमआयडीसी येथे धाड टाकली. यावेळी मे. सावला फूड अँड कोल्ड स्टोरेज डी-३९ आणि डी-५१४ या पेढीत अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. अन्न पदार्थांच्या वेष्टनावर आयातदाराचे, मूळ निर्यातदार देशाचे नाव, पत्ता नमूद नव्हता, उत्पादनाची तारीख तसेच इतर आवश्यक ती माहिती नमूद नव्हती. आवश्यक त्या परवानग्या, परवानाही घेण्यात आला नसल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. अन्न पदार्थांचा साठा अत्यंत अस्वच्छ ठिकाणी, उंदीर आणि झुरळांचा सुळसुळाट असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे आढळले. असा हा २९ कोटी ६७ लाख ७१ हजार ११० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. अन्न पदार्थांचे ३५ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सहआयुक्त, (अन्न) बृहन्मुंबई, एफडीए शशिकांत केकरे यांनी दिली. नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर पेढीधारकाविरोधात पुढील कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>आज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किड लागलेले, सडलेले बदाम, खजूर, मसाले आणि अन्य अनेक पदार्थांचा यात समावेश आहे. अशा अन्न पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अन्न पदार्थांची खरेदी करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केकरे यांनी केले. दरम्यान आता आयात अन्न पदार्थांचा साठा करणाऱ्या पेढीधारकांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.