शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती भक्कम असून, आगामी लोकसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढवतील, असे सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले. आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि पुढील निवडणूक आम्ही एकत्रितपणेच लढवू, असे रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी सांगितले. 
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या मुंबईतील एका रुग्णालयाच्या उदघाटन कार्यक्रमात रामदास आठवले, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
आमच्या महायुतीत फूट पडावी, असे अनेक जणांना वाटते आहे. मात्र, आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसून, लोकसभेची निवडणूक आम्ही एकत्रितच लढवू, असे आठवले म्हणाले. आठवले, ठाकरे, मुंडे ही ‘एटीएम’ युती अभेद्य असून, आम्ही एकत्रितच लढणार आहोत. आमची युती ही केवळ जागेसाठी किंवा पदांसाठी नसल्याचे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केले.