अजामीनपात्र गुन्हा दाखल करून तीन दिवस झाले तरी विभागप्रमुख विनोद घोसाळकर यांना अटक झालेली नाही. त्याच वेळी शिवसेना नेतृत्वानेही कोणतीच पावले उचललेली नसल्याने ‘असुरक्षित नगरसेविका’ संभ्रमात पडल्या आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयात घेतल्या जाणाऱ्या जबाबांमुळे ‘न्याय नको पण जबाब आवरा’ अशी अवस्था झाली आहे.
तक्रार दाखल करूनही पोलिसांनी विनोद घोसाळकर आणि त्यांचा पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई न केल्याने महिला वर्गामध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस नगरसेविका आणि सामाजिक संस्थांमधील कार्यकर्त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी घोसाळकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल केला.  परंतु तीन दिवस लोटले तरी त्यांना अटक झालेली नाही. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तीचा घोसाळकर पिता-पुत्राला आशीर्वाद असल्याची जोरदार चर्चा दहिसर परिसरात सुरू झाली .
अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला असतानाही घोसाळकर यांना अटक करण्याऐवजी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन शीतल म्हात्रे यांचा वारंवार जबाब घेत आहेत. दोन वेळा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना एक प्रश्नावली पाठविली. जबाबात केलेले आरोप कधी, केव्हा, कोणासमक्ष झाले त्या व्यक्तींची नावे, पत्ते सादर करावे, असे पोलिसांनी म्हात्रे यांना कळविले आहे.
तर ‘रक्तदाब नियंत्रणात येत नसल्याने अद्यापही शीतल रुग्णालयात आहे. अशा परिस्थितीत पोलीस वारंवार जबाब घेत असल्याने तिला त्रास होत आहे,असे त्यांचे पती मुकेश म्हात्रे यांनी सांगितले.