मुंबई : ‘मी एक नट असल्याचे विसरून प्रेक्षक म्हणून ट्रेलर पाहिला. हा ट्रेलर खूपच थरारक होता आणि आपण हे केले आहे का? असा प्रश्न पडला. या चित्रपटातील भव्यता काम करताना आपसूकच जाणवत गेली”, असे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यात सांगितले.
येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार आणि त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचलंय की माझो नवस पूर्ण झालो, असे म्हणत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी उघडलेला दशावताराचा पेटारा आणि त्यानंतरचे घेतलेले विविध अवतार, घनदाट जंगल, कातळशिल्पे, कोकणातील सौंदर्य, गूढ विचारात नेणारे पार्श्वसंगीत व मालवणी भाषा कानावर पडत ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर समोर आला.
झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट १२ सप्टेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘दशावतार’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा सोमवार, १८ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. याप्रसंगी चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी सावंतवाडी येथील श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळाने दशावताराचे सादरीकरण केले. तसेच कार्यक्रमस्थळी लक्षवेधी रांगोळीसह कोकणातील दशावताराची ओळख करून देणारे विशेष दालनही उभारण्यात आले होते. ‘दशावतार’ चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्रबुद्धे, मृणाल सहस्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. तर कलानिर्मात्याची धुरा ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांनी सांभाळली आहे.

‘मी कोकणात चार ते पाच चित्रपट केले होते, परंतु ‘दशावतार’ चित्रपटातील कोकण कधीही पाहिले नव्हते. दिग्दर्शक सुबोध खानोलकर याने कोकणाचे सौंदर्य, जंगल, नद्या आदी सर्व गोष्टींचा प्रभावीपणे वापर केला आहे. त्यामुळे चित्रीकरण करताना कोकणाच्या सौंदर्यात व भव्यतेत हरवून गेलो आणि काम करताना मजा आली. हा माझ्यासाठी एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव होता”, असेही दिलीप प्रभावळकर म्हणाले.
‘लहानपणापासून कोकणातील कला व प्रथा पाहत आलो आहे. महाविद्यालयीन जीवनात एकांकिका केल्यानंतर चित्रपटाकडे वळावेसे वाटले आणि आपल्या मातीतील कला प्रेक्षकांसमोर आणायची होती. नेहमी मराठी चित्रपटसृष्टीकडून भव्यतेची अपेक्षा असते. ही भव्यता आपल्या निसर्गात आणि लोककलेत आहे. हेच जाणून कोकणातील दशावतारावर आधारित चित्रपटाची निर्मिती केली. तसेच आपल्या मातीतील गोष्ट आपल्याच भाषेत सांगणे आवश्यक आहे. दर्जेदार कलाकृती केल्यानंतर आपला चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचल्यानंतरही भाषेचे बंधन राहणार नाही, प्रेक्षक भाषेच्या पलीकडे जाऊन भव्यता व कलात्मकता पाहून चित्रपट पाहतील”, असे मत लेखक – दिग्दर्शित सुबोध खानोलकर याने सांगितले. तर ‘सध्या महाराष्ट्रात जमिनीशी नाते असलेल्या कलाकृती घडत आहेत, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ‘दशावतार’ उत्कंठा, व्यक्तिरेखा आणि सक्षम मांडणी असल्यामुळे प्रेक्षकांकडून चित्रपट पाहिला जाईल”, असा विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे यांनी व्यक्त केला.