ज्येष्ठ पर्यावरणवादी, वन्यजीव, पक्षी अभ्यासक आणि वास्तुविशारद उल्हास राणे यांचे मंगळवारी बंगळूरु येथे करोनामुळे निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळूरु येथे कार्यरत असलेल्या ज्येष्ठ प्राध्यापिका रेने बोर्जेस या त्यांच्या पत्नी होत.

व्यवसायाने वास्तुरचनाकार असलेले राणे ८० च्या दशकापासून पर्यावरण चळवळीत सक्रिय होते. वास्तुविशारद, पर्यावरण आणि परिस्थितीकी विज्ञानमध्ये पदव्युत्तर पदविका, समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक पर्यावरण संस्थांच्या उपक्रमांत त्यांनी हिरिरीने भाग घेतला. पश्चिम घाट बचाव आंदोलन या १९८७ च्या देशव्यापी मोहिमेचे ते सहसमन्वयक होते. त्याचबरोबर महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या उभारणीत सुरुवातीपासून उल्हास राणे यांचा सहभाग राहिला. महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे ते दोन वेळा अध्यक्ष होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील अग्रगण्य अशा ‘सलीम अली पक्षी विज्ञान आणि प्राकृति केंद्र’ (सलीम अली सेंटर ऑफ ऑर्नोथोलॉजी अ‍ॅण्ड नॅचरल हिस्ट्री-सॅकॉन), कोयम्बतूर या संस्थेचे राणे हे संस्थापक सदस्य होत. बॉम्बे नॅचर हिस्ट्री सोसायटीचे मानद सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे (तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम) राणे काही काळ विश्वस्त होते. धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या जडणघडणीत आणि रचनेत १९८२ पासून त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. मराठी विज्ञान परिषदेतदेखील राणे कार्यरत होते.

मुंबई आणि बंगळूरु येथील ‘एन्व्हायरोडिझायनर्स’ या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील अनेक वारसा वास्तू, पर्यटनस्थळे यांच्या डिझाईनची कामे केली आहेत. आसामधील देशातील पहिले फुलपाखरू उद्यान उभारण्याचे काम राणे यांनी केले. त्याचबरोबर ईशान्येकडील अनेक राज्यांच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी त्यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत योजना तयार केल्या.